बीड: वंचित बहुजन आघाडीला मत देणे म्हणजे जातीयवादी भाजपला मदत करण्यासारखे आहे. याचा अनुभव मतदारांनी लोकसभा निवडणुकीत घेतला आहे. पुन्हा तीच चूक करून आपले मत वाया घालवू नका. जो लेक तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करतो, त्याला एकदा संधी द्या, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केले.
परळी शहरातील भीमनगर भागातील विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, यापूर्वी शरद पवार यांनीही वंचितवर टीका केली होती. मतांचे विभाजन होऊन भाजपला फायदा होत असल्याचे शरद पवार म्हणाले होते. आता एक नवीन पार्टी आलीय, वंचित म्हणजे गरीब, पण तसं नाही.. त्याचा फायदा भाजपला होतो. धर्मनिरपेक्ष मताची फाटाफूट होत आहे आणि त्यामुळे जातीयवादी पक्षाला त्याचा फायदा होतो, असे शरद पवार म्हणाले होते.