कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांनी महाराष्ट्रात खळबळ माजवली असताना, कोल्हापुरात मात्र अंतर्गत बंडाची ठिणगी पडली होती. शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी पक्षातील नाराजीमुळे उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता, आणि त्यांना शिंदे गटाकडून खुली ऑफरही मिळाली होती. पण उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपानंतर आणि सुनील प्रभू यांच्या मध्यस्थीने पवार यांची नाराजी दूर झाली आहे. आता बुधवारी दुपारी 12:30 वाजता संजय पवार मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार असून, यावेळी कोल्हापूरच्या राजकारणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी रविकिरण इंगवले यांची नियुक्ती झाल्याने संजय पवार नाराज झाले होते. ही नियुक्ती करताना पक्षाने आपल्याला विश्वासात घेतलं नाही, असा आरोप करत पवार यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यांनी स्पष्ट केलं होतं की, ते शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरेंसोबत राहतील, पण पक्षातील अपारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पवार म्हणाले, “1990 पासून मी शिवसेनेसाठी एकनिष्ठपणे काम केलं. मातोश्रीचे आदेश पाळले. पण गेल्या 10 वर्षांत पक्षात काही वेगळं घडलं. जिल्हाध्यक्षपदाची निवड करताना विश्वासार्हता आणि पारदर्शकता तपासली गेली नाही. विधानसभा निवडणुकीत षडयंत्र झालं. मधुरीमाराजे यांनी अचानक माघार का घेतली?” शिंदे गटाची ऑफर आणि ठाकरेंचा हस्तक्षेप पवार यांच्या नाराजीनंतर शिंदे गटाने संधी साधली. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी पवार यांना जाहीरपणे पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं. मात्र, ठाकरे गटाने तातडीने हालचाली केल्या. सुनील प्रभू यांनी पवार यांच्याशी चर्चा केली, आणि स्वत: उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन पवार यांच्याशी संवाद साधला. या चर्चेत पवार यांची नाराजी दूर झाली, आणि त्यांनी पुन्हा ठाकरे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेत एकीचा नवा अध्याय सुरू बुधवारी होणाऱ्या मातोश्रीवरील भेटीत संजय पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोल्हापूरच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसह पक्षातील अंतर्गत समन्वयावरही यावेळी लक्ष केंद्रित होईल. पवार यांच्या नाराजीनंतर ठाकरे गटाने दाखवलेली तत्परता आणि पवार यांचा पुन्हा पक्षाशी जोडला जाणे, यामुळे कोल्हापूर शिवसेनेत एकीचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हं आहेत. संजय पवार यांनी आपली नाराजी व्यक्त करताना पक्षातील अपारदर्शक कारभारावर बोट ठेवलं. ते म्हणाले, “जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक होते, पण नियुक्ती करताना उपनेत्याला विचारलं गेलं नाही. गेल्या 36 वर्षांत मी शिवसेनेसाठी प्रामाणिकपणे काम केलं, पण अशा निर्णयांमुळे कार्यकर्त्यांचा विश्वास डळमळतो.” त्यांच्या या टिप्पणीने पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. संजय पवार यांच्या मातोश्रीवरील भेटीनंतर कोल्हापूर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी कमी होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिक पातळीवर हस्तक्षेप करुन पवार यांचा विश्वास पुन्हा संपादन केला आहे. यामुळे ठाकरे गटाला कोल्हापूरात आगामी निवडणुकांसाठी मजबूत पकड ठेवण्यास मदत होईल. युतीच्या चर्चा आणि स्थानिक पातळीवरीलराजकारण यामुळे कोल्हापूरचं राजकीय चित्र आगामी काळात आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.