Sitaare Zameen Par: भारतीय सिनेमा क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठत, आमिर खान यांचा सुपरहिट चित्रपट ‘सितारे जमीन पर’ 1 ऑगस्ट 2025 पासून यूट्यूबवर Movies-on-Demand स्वरूपात प्रदर्शित होणार आहे. थिएटरमध्ये 250 कोटींपेक्षा अधिक कमाई केलेल्या या चित्रपटाचा आता डिजिटल प्रवास सुरू होत आहे. या चित्रपटात आमिर खान, जेनेलिया देशमुख यांच्यासह बौद्धिक अपंगत्व असलेल्या 10 कलाकारांनी काम केले आहे. प्रेम, हास्य आणि समावेशाचे संदेश देणारा हा चित्रपट 2007 मधील ‘तारे जमीन पर’ चा स्पिरिच्युअल उत्तराधिकारी मानला जातो. भारतात केवळ ₹100 मध्ये आणि अन्य 38 देशांमध्ये स्थानिक दरात प्रेक्षक यूट्यूबवर हा चित्रपट पाहू शकतील. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप आदी डिव्हाइसवर इंटरनेटद्वारे सहज उपलब्ध होणाऱ्या या चित्रपटासाठी प्रादेशिक भाषांमध्ये डबिंग व सबटायटल्सची सोय देखील करण्यात आली आहे. आमिर खान यांनी सांगितले की,“गेल्या 15 वर्षांपासून मनात असलेलं स्वप्न आता पूर्ण होतंय म्हणजे सिनेमा सर्वांपर्यंत योग्य किंमतीत पोहोचवणं.” यूट्यूब इंडियाच्या कंट्री मॅनेजिंग डायरेक्टर गुंजन सोनी यांनी या भागीदारीला भारतीय सिनेमाला जागतिक व्यासपीठावर नेणारे पाऊल म्हणून गौरवले आहे. आज यूट्यूब केवळ टीझर आणि ट्रेलरसाठी न राहता, पूर्ण चित्रपट अनुभवाचा एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म बनला आहे. भारतात यूट्यूबवरील CTV वापर वेगाने वाढतो आहे आणि दररोज 7.5 अब्ज मनोरंजन विषयक व्हिडिओ पाहिले जातात. या डिजिटल रिलीजमुळे ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास सज्ज झाला आहे.