‘झिम्मा 2’च्या यशानंतर हेमंत ढोमे घेऊन येतोय नवा चित्रपट; दमदार पोस्टर रिलीज

Hemant Dhome New Movie | दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमेचा ‘झिम्मा’ चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर आलेल्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाने देखील प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. आता पुन्हा एकदा हेमंत ढोमे एक नवा चित्रपट घेऊन येट आहे. या चित्रपटाचे नाव ‘फसक्लास दाभाडे’ असे आहे.
नुकतेच रिलीज झालेल्या चित्रपटाच्या पोस्टरवर क्षिती जोग, अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर ट्रॅक्टरवर बसलेले दिसत असून त्यांचा गावरान अंदाज पाहायला मिळत आहे. ‘झिम्मा च्या टीम कडून नवी भेट… तुमच्या आमच्यातल्या सगळ्या भावंडांची… सोनू… पप्पू… तायडी आणि त्यांच्या इरसाल कुटुंबाची खुळ्यासारखी फसक्लास श्टोरी!’ असं कॅप्शन या पोस्टरला देण्यात आलं आहे. 15 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
तीन भावंडं आणि त्यांच्या कुटूंबाची भन्नाट गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं चित्रीकरण हेमंतच्या स्वतःच्या गावात शूट केला आहे. या सिनेमाचं शूटिंग पार पडल्यानंतर त्याचा गावात खास सत्कार करण्यात आला. सोशल मीडियावर हेमंतने खास पोस्ट शेअर केली.
त्यात त्याने लिहिलं, “हा फोटो आहे मी माझ्या गावाकडे गेल्यानंतर माझ्या माणसांनी केलेल्या सत्काराचा! त्या सगळ्यांचा माझ्यावर खूप जीव आहे आणि माझाही त्यांच्यावर! बोलता बोलता माझी भाषा तिथली होते आणि पण लगेच तिथला होतो… प्रचंड प्रेम, आपुलकी आणि खूप जास्त आदर हा मला माझ्या गावाविषयी लहानपणापासूनच होता म्हणजे सगळ्यांनाच असतो… पण मला जरा जास्तच आहे!
View this post on Instagram
मला कायम वाटायचं माझं गाव आणि आजूबाजूचा परीसर खूप सुंदर आहे! लहानपणी कुठे माहित होतं आपण मोठे झाल्यावर दिग्दर्शक होऊ, निर्माता होऊ? पण आता माझा सातवा चित्रपट लिहिताना, दिग्दर्शित करताना आणि माझी आणि क्षितीची म्हणजे आपल्या चलचित्र मंडळीची चौथी निर्मिती असताना मी आणि क्षितीने मनाशी ठरवलं होतं हा चित्रपट आपल्या गावीच बनवायचा… आपल्या भागातले लोक घेऊन आपल्या भागातच चित्रीत करायचा! गंमत बघा माझ्या लाडक्या टिमसोबत आम्हाला आपला हा चित्रपट स्वतःच्या शेतात, स्वतःच्या मातीत शुट करता आला!लय भारी वाटलं राव!!!
View this post on Instagram
आता तो पुर्ण झालाय आणि लवकरच तुमच्या भेटीला येतोय… कधी, कसा ते सगळं उद्या सांगतोच! पण माझ्या अत्यंत जवळचा विषय… मी जे जगलो, जे पाहिलं अनुभवलं ते सगळं मांडायचा प्रयत्न केलाय… हळू हळू पुढच्या कथांमधून सुद्धा मांडत राहिनच!तर मंडळी माझ्या मातीचा अभिमान आता तुम्हा सगळ्यांना हक्काने सांगायचाय… कोणीतरी म्हणलेलच आहे, “सिनेमाचा विषय जेव्हा लेखकाच्या आणि दिग्दर्शकाच्या अत्यंत जवळचा असतो तेव्हा तो प्रेक्षकांच्याही खूप जवळचा होतो. तर आता वेळ आलीय हे तपासून बघण्याची…तुमच्यासमोर हक्काने पुन्हा एकदा थोडसं चाचपडायची…तर उद्या सग्गळं “फसक्लास” होणार!”
दरम्यान, हेमंतने ‘पोस्टर गर्ल’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ यांसारखे दर्जेदार चित्रपट मराठी सिनेसृष्टीत हेमंतने दिले आहेत. त्यानंतर आता त्याच्या आगामी चित्रपटासाठी देखील चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.





