ssc result 2020 : मुलाला सर्व विषयांत ३५ गुण मिळाल्यानंतर वडिलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया…

औरंगाबाद – कोरोनामुळे यंदा दहावीच्या निकालासाठी बरीच वाट पहावी लागली. अखेर काल निकाल ऑनलाईन जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनीही सुटकेचा निश्वास सोडला. यंदाचा दहावीचा निकाल गेल्या १५ वर्षातील सर्वाधिक असून अनेक विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळालं आहे.
मात्र काल निकाल लागल्यापासूनच बीड येथील धनंजय नखाते या विद्यार्थ्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. निकालानंतर चर्चा म्हंटल्यावर तुम्हाला नक्कीच वाटेल की, या विद्यार्थ्याने किमान ९० टक्क्यांपेक्षा तरी अधिक गुण मिळवले असतील. मात्र तुमचा हा अंदाज साफ चुकीचा असून या विद्यार्थ्याला प्रत्येक विषयात ३५ गुण मिळाल्याने सर्वत्र त्याच्याबाबतच चर्चा सुरु आहे.
धनंजय हा उमरी येथील रामेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी. काल ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर त्याला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान-तंत्रज्ञान आणि समाजशास्त्र अशा सहाही विषयांमध्ये ३५ गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान ३५ गुणांची आवश्यकता असते.
धनंजयला सर्व विषयात उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले ३५ गुण मिळाल्याने तो काठावर का होईना पण पास झाला असून यामुळे त्याचे पालकही खूप खुश आहेत. शेतात मोलमजुरीचे काम करणारे धनंजयचे वडील नारायण नखाते यांनी मुलाच्या ‘गुणांबाबत’ बोलताना, “धनंजयला केवळ ३५ टक्के गुण मिळाले असले तरी तो पास झाला याचाच आनंद अधिक आहे. आम्ही त्याला पुढील शिक्षण देणार आहोत. त्याला महाविद्यालयीन शिक्षणासाठी माजलगाव येथे प्रवेश घेऊन देण्याचा विचार आम्ही करतोय.”
आपल्याला मिळालेल्या गुणांबाबत बोलताना धनंजय म्हणतो, “मला मिळालेले गुण पाहून आश्चर्यचकित झालो. मला शाळेमध्ये असताना हिंदी विषयाची आवड होती मात्र आता पुढील शिक्षण विज्ञान शाखेतून घ्यायचे आहे.”
दरम्यान, धनंजयने सर्व विषयात ३५ गुण मिळवत १० वी पर्यंतच्या शिक्षणाचा टप्पा यशस्वीरीत्या पार केल्याने गावकऱ्यांनी देखील त्याचा जंगी सत्कार केला.





