Donald Trump – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत व पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. आपल्या दाव्यामध्ये त्यांनी ३५० टक्के कर लादण्याची धमकी दिल्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एकमेकांवरील हल्ले थांबवण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून सांगितले की आम्ही युद्ध करणार नाही, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. मे महिन्यात भारत व पाकिस्तान या दोन देशांतील तणाव वाढला होता. यावेळी ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा दावा करण्यात येत आहे. ट्रम्प यांनी युद्ध थांबवल्याचा आतापर्यंत 60 पेक्षा अधिक वेळा दावा केला आहे. मात्र भारताने कोणत्याही तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाला सातत्याने नकार दिला आहे. ट्रम्प यांनी बुधवारी पुन्हा एकदा सांगितले की, मी संघर्ष सोडवण्यात चांगला आहे आणि मी नेहमीच करत आहे. गेल्या काही वर्षांत आणि त्यापूर्वीही मी या दिशेने उत्तम काम केले आहे. मी वेगवेगळ्या संघर्षांबद्दल बोलत आहे…जसे की भारत, पाकिस्तान… ते एकमेकांवर अणुहल्ले करणार होते, असा दावा देखील ट्रम्प यांनी केला. अमेरिका व सौदी गुंतवणूक मंचावर ट्रम्प यांनी युद्ध थांबवल्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, मी दोन्ही अण्वस्त्रधारी देशांना सांगितले की, ते युद्ध सुरु ठेवू शकतात. परंतू दोन्ही देशांवर मी 350 टक्के कर लादणार. ते आता अमेरिकेसोबत व्यापार करु शकणार नाहीत. ट्रम्प यांनी अमेरिका-सौदी गुंतवणूक मंचात दावा केला की, त्यांनी दोन्ही अण्वस्त्रधारी शेजारी देशांना सांगितले होते की ते युद्ध सुरू ठेवू शकतात, परंतु मी दोन्ही देशांवर ३५० टक्के कर लादत आहे. ते आता अमेरिकेसोबत व्यापार करू शकणार नाहीत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी दोन्ही देशांना सांगितले की, मी हे करणार आहे (कर लादणे)… तुम्ही एकमेकांविरुद्ध अण्वस्त्रे वापरावीत, लाखो लोक मारावेत आणि लॉस एंजेलिसवर अण्वस्त्रांची धूळ उडवावी अशी माझी इच्छा नाही. त्यानंतर ट्रम्प म्हणाले की ते पूर्णपणे तयार आहेत आणि त्यांनी अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांना सांगितले होते की ते संघर्ष संपवण्यासाठी ३५० टक्के कर लादतील आणि जर दोन्ही देशांनी युद्ध थांबवले तर आमचा चांगला व्यापार करार होईल. इतर कोणताही राष्ट्राध्यक्ष असे करत नाही… आठ पैकी पाच युद्धे व्यापार आणि करांमुळे सोडवली गेली. मी ते केले. शाहबाज यांनी मानले आभार पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी लाखो लोकांचे जीव वाचवण्यासाठी व्हाईट हाऊस येथील चीफ ऑफ स्टाफ सुसी विल्स यांच्यासमोर माझे आभार मानले असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. त्यानंतरही ट्रम्प यांनी दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आम्ही युद्ध करणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर करार करण्यासाठी आम्ही तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.