सुनील पालनंतर आणखी एका अभिनेत्याचे अपहरण; किडनॅप करून 12 तास…

Mushtaq Khan | अनेक चित्रपटांतून आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांमध्ये ओळख निर्माण करणारा कॉमेडियन मुश्ताक खान यांचे मेरठ-दिल्ली हायवेवरून अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 20 नोव्हेंबरला मुश्ताक खान एका अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीला पोहोचले होते, मात्र त्यावेळी त्यांच्यासोबत हा प्रकार घडला.
मुश्ताक खान यांचं काही दिवसांपूर्वी अपहरण झाल्याची माहिती त्यांचे बिजनेस पार्टनर शिवम यादव यांनी दिली आहे. मेरठला होणाऱ्या या इव्हेंटसाठी मुश्ताक खान यांना अॅडव्हानसमध्ये पैसे देण्यात आले होते. त्यांना विमानाचे तिकीटही देण्यात आले होते. पण, दिल्ली एअरपोर्टला पोहोचल्यानंतर मुश्ताक खान यांच्याबरोबर हा प्रकार घडला, अशी माहिती त्यांचे बिजनेस पार्टनर शिवम यादव यांनी दिली आहे.
दिल्लीला पोहोचताच मुश्ताक यांना कारमध्ये बसवून बिजनौरजवळील निर्जन भागात नेण्यात आले, जिथे त्यांना अपहरणकर्त्यांनी सुमारे 12 तास कैद केले. त्याच्याकडून खंडणी म्हणून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. यानंतर अपहरणकर्त्यांनी मुश्ताक आणि त्याच्या मुलाच्या बँक खात्यातून दोन लाखांहून अधिक रुपये काढले.
शिवमच्या म्हणण्यानुसार, ‘सकाळची अजान ऐकून मुश्ताक खान पळून जाण्यात यशस्वी झाला. अजानच्या आवाजावरून त्याला जवळच मशीद असल्याचे जाणवले. या अभिनेत्याने संधीचा फायदा घेत तेथून पळ काढला आणि लोकांच्या मदतीने तो अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला.
‘मुश्ताक आणि त्याचे कुटुंब त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराने हादरले होते. मात्र, स्वत:ला शांत करून त्यांनी एफआयआर दाखल केली आहे. मी स्वत: बिजनौरला जाऊन अधिकृत एफआयआर दाखल केला. आमच्याकडे विमानाची तिकिटे, बँक खाती आणि विमानतळाजवळील सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा आहे,’ असे शिवम यांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कॉमेडियन सुनील पालचं अपहरण झाल्याचं समोर आले होते.





