Onion Price : साखरेनंतर आता कांद्याने आणले डोळ्यात पाणी! स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले
Kitchen budget : पिंपरी-चिंचवडमध्ये कांदा ४५ ते ६० रुपये किलो; लसूण २०० रुपयांवर

पिंपरी/ रावेत – साखरेच्या दरवाढीने आधीच सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसलेली असताना आता कांदा आणि लसणाच्या वाढत्या दराने स्वयंपाकघराचे बजेट पुन्हा एकदा कोलमडले आहे. शहरातील किरकोळ बाजारात कांद्याचा दर ४५ ते ६० रुपये किलो, तर लसणाचा दर १८० ते २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.
विशेष म्हणजे, आठ-दहा दिवसांपूर्वी २१ ते २५ रुपये किलो असलेला कांदा आता दुपटीहून अधिक दराने विकला जात असल्याने ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे.
कांद्याचा भाव वाढला; खरेदीचे गणित बदलले
पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, निगडी, वाकड आणि परिसरातील किरकोळ बाजारांमध्ये कांद्याच्या दरवाढीची झळ ग्राहकांना जाणवत आहे.
पूर्वी किलोभर कांदा सहज खरेदी करणारे ग्राहक आता अर्धा किलो किंवा गरजेपुरताच कांदा घेत असल्याचे चित्र आहे. आधीच डाळी, खाद्यतेल, मसाले आणि भाजीपाल्याच्या किमती वाढलेल्या असताना कांद्याच्या दरवाढीने महिन्याच्या किराणा बजेटवर आणखी ताण आला आहे.
‘कांदा’ रोजच्या ताटातील अनिवार्य घटक
कांदा हा केवळ भाजीपाला नसून घरगुती तसेच खाद्य व्यवसायाच्या अर्थकारणातील महत्त्वाचा घटक आहे. पोहे, उपमा, मिसळ, पावभाजी, भाजी, आमटी, उसळ, बिर्याणीपासून चटणी आणि कोशिंबिरीपर्यंत कांद्याचा वापर होतो.
शहरातील हजारो नाश्ता सेंटर, खानावळी, हॉटेल्स आणि हातगाड्यांवरील खाद्यपदार्थांमध्येही कांदा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे दरवाढीचा फटका केवळ गृहिणींनाच नव्हे, तर छोट्या खाद्य व्यावसायिकांनाही बसत आहे.
आवक घटली, पावसाचा फटका
बाजारातील कांद्याची आवक कमी होणे हे दरवाढीमागील प्रमुख कारण मानले जात आहे. पावसाळी वातावरणामुळे काढणी, वाहतूक आणि बाजारातील आवकेवर परिणाम झाला आहे.
तसेच साठवणुकीतील काही कांदा खराब झाल्याने चांगल्या प्रतीच्या कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. दुसरीकडे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढत असल्याने मागणी आणि पुरवठ्यातील तफावत वाढली आहे. परिणामी किरकोळ बाजारातील दर चढले आहेत.
लसूणही ‘महाग’
कांद्याबरोबर लसणानेही ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. काही दिवसांपूर्वी सुमारे १२५ रुपये किलो असलेला लसूण आता १८० ते २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. लसणाची कमी आवक आणि वाढती मागणी यामुळे त्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
३५ रुपयांचा सरकारी कांदा दिलासा देणार?
दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून ३५ रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा विविध शहरांमध्ये पोहोचविला जात असून, नाशिकमधून विशेष मालगाड्यांद्वारे कांदा पाठविण्यात येत आहे. सरकारी विक्री केंद्रे आणि फिरत्या वाहनांमधून ग्राहकांना हा कांदा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये हा स्वस्त कांदा नेमका कुठे आणि किती प्रमाणात उपलब्ध आहे, याची माहिती नागरिकांना सहज मिळणे गरजेचे आहे. अन्यथा बाजारात ५०-६० रुपयांचा कांदा आणि सरकारी योजनेत ३५ रुपयांचा कांदा, अशी तफावत सर्वसामान्यांच्या अडचणी वाढवू शकते.
आवक वाढून पुरवठा सुरळीत झाला तरच कांद्याच्या दरात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मात्र साखरेनंतर कांद्यानेही पिंपरी-चिंचवडकरांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.





