रशियानंतर आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पला भेटणार, जाणून घ्या भेट कधी आणि कुठे होणार? युद्ध थांबणार का?

वॉशिंग्टन : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी सोमवारी वॉशिंग्टन डीसी येथे भेट होणार असल्याचे जाहीर केले. एका सोशल मीडिया पोस्टद्वारे झेलेन्स्की यांनी निमंत्रणाबद्दल ट्रंप यांचे आभार मानले.
यापूर्वी ट्रंप आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची अलास्कामध्ये भेट झाली होती. या भेटीत रशिया-युक्रेन युद्धात तात्पुरता युद्धविराम मिळवण्याबाबत ठोस निर्णय झाला नसला, तरी दोन्ही नेत्यांनी ही भेट सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. या भेटीनंतर ट्रंप यांनी झेलेन्स्की आणि युरोपातील नेत्यांशी लवकरच चर्चा करणार असल्याचे सांगितले होते.
झेलेन्स्की-ट्रंप यांच्यात तासभर चर्चा –
झेलेन्स्की यांनी सांगितले की, त्यांनी आणि ट्रंप यांनी सुमारे एक तास टेलिफोनवर चर्चा केली. अलास्का शिखर परिषदेत युक्रेनचा सहभाग नसल्याने युक्रेनच्या जनतेत नाराजी होती, असे त्यांनी नमूद केले. पुढील चर्चेत ट्रंप, पुतिन आणि झेलेन्स्की या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
We had a long and substantive conversation with @POTUS. We started with one-on-one talks before inviting European leaders to join us. This call lasted for more than an hour and a half, including about an hour of our bilateral conversation with President Trump.
Ukraine reaffirms… pic.twitter.com/64IPVhtFaB
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) August 16, 2025
व्हाइट हाउसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी सांगितले की, ट्रंप यांनी अलास्काहून वॉशिंग्टनला परतताना झेलेन्स्की यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केली. या कॉलमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टारमर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, नाटोचे महासचिव मार्क रूट, युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन आणि जर्मन चान्सलर फ्रेडरिक यांचाही सहभाग होता.
रशिया-युक्रेन युद्धाला चार वर्षे –
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या चार वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
ओव्हल ऑफिसमधील वाद
यावर्षी फेब्रुवारीत ओव्हल ऑफिसमध्ये झेलेन्स्की आणि ट्रंप यांच्यातील चर्चेदरम्यान वाद झाला होता. मात्र, नंतर झेलेन्स्की यांनी हा वाद दु:खद असल्याचे सांगत, कायमस्वरूपी शांतीसाठी ट्रंप यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. ही भेट रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शांतीप्रस्थापनेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते, अशी आशा व्यक्त केली जात आहे.





