Devendra Fadnavis : राहुल गांधी यांच्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा नागपूरमध्ये Gen-Zसोबत संवाद; तरुणाईच्या प्रश्नांना दिले उत्तर
Devendra Fadnavis: 'राजकारणात प्रवेश हा व्यवसाय म्हणून केला नाही, तर...'

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरमध्ये जेन झीसोबत संवाद साधला. यादरम्यान त्यांना राजकारणाचं क्षेत्र कसं निवडलं ते मुख्यमंत्री पदाचा प्रवास याबद्दचे काही अनुभव सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “तसं तर हिंदी चित्रपटात अनिल कपूर एका दिवसाचेही मुख्यमंत्री बनतात, पण ते इतके सोपे नाही. बघा, या देशात आपल्या संविधानाने लोकशाही दिली आहे आणि या लोकशाहीची खासियत ही आहे की, जो देवेंद्र फडणवीस कधी हा विचारही करू शकत नव्हता की तो नगरसेवक बनेल, तो मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचला.
किंवा गुजरातच्या रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान बनला. तर ही ताकद भारताच्या संविधानाची, लोकशाहीची आहे. ही भारतातील आपल्या युवाशक्तीची ताकद आहे आणि मी असे मानतो की, माझ्यासाठीही हा सगळा प्रवास म्हणजे कधीही न विचार केलेला असा प्रवास आहे. ”
जनतेने विश्वास दाखवला आणि एक दिवस…
“कारण जेव्हा मी राजकारणात आलो, तेव्हा फक्त विचारांनी प्रेरित होऊन आलो होतो आणि त्या वेळी ज्या विचारांसोबत आणि ज्या पक्षात मी काम करत होतो, कधी वाटत नव्हते की सत्ता सुद्धा येईल. आम्ही तर असे मानायचे की विरोधी पक्षात राजकारण करण्यासाठीच जन्माला आलो आहोत आणि रोज आंदोलने करायचो, रोज लढाया लढायचो. पण जनतेने विश्वास दाखवला आणि पायरी-पायरी चढत चढत एक दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राजकारणाचा वापर कायम देशहितासाठी
राजकारणात प्रवेश हा व्यवसाय म्हणून केला नाही, तर समाजातील परिस्थिती बदलण्यासाठी आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी राजकारण हे प्रभावी माध्यम असल्याने आपण त्यात आलो. राजकारणाचा वापर कायम देशहितासाठी केला. येथे बसलेल्या कोणत्याही व्यक्तीने मनात ठरवले, तर आपले लोकशाहीचे संविधान त्याला मुख्यमंत्री बनवू शकते. त्याला कोणीही रोखू शकत नाही,” असे फडणवीस म्हणाले, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थी चळवळीपासून राजकीय प्रवास
विद्यार्थी परिषदेत काम करत असताना वयाच्या १८व्या वर्षी लाल चौकात तिरंगा फडकविण्याची यात्रा सुरू केली. १० हजार विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन केले. पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोरही आंदोलन करण्याची वेळ आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लाल चौकात तिरंगा फडकविला. तसेच बाबरी मशीद आंदोलनातही आपण सहभागी झालो होतो. कारसेवक म्हणून काम केले आणि अनेक महिने तुरुंगवास सहन केला. बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आला, त्या वेळी आपण तेथे उपस्थित होतो. हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा:





