अमेरिकेच्या ‘गुंडगिरी’विरोधात चीनने भारतापाठोपाठ मागितली युरोपकडे साथ, टॅरिफ धोरणाविरोधात केले मदतीचे आवाहन

बीजिंग – चीन आणि अमेरिकेदरम्यान आयात शुल्कावरून सुरू झालेल्या संघर्षामध्ये आता इतर देश देखील ओढले जाण्याची लक्षणे दिसत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांवर लावलेल्या मोठ्या आयात शुल्काच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली असली तरी चीनवर मात्र त्यांनी पुन्हा वाढीव आयात शुल्क लावले आहे.
यामुळे संतप्त झालेले चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आता युरोपातल्या देशांना मदतीचे आवाहन केले आहे. अमेरिकेच्या एकतर्फीपणे केल्या जाणाऱ्या गुंडगिरीला एकत्रितपणे विरोध करण्यासाठी युरोपीय संघाने पुढे यावे, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे.
युरोपीय संघाचा सदस्य देश असलेल्या स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सॅन्चेझ चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या बरोबरच्या बैठकीदरम्यान आर्थिक जागतिकीकरण आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी वातावरणाचे रक्षण करण्यासाठी चीन आणि युरोपीय संघाने आपली जबाबदारी पार पाडायला हवी, अशी अपेक्षा जिनपिंग यांनी व्यक्त केली.
आर्थिक जागतिकीकरण आणि मुक्त व्यापाराला चीन आणि युरोपीय संघाचा ठाम पाठिंबा आहे. अमेरिकेच्या गुंडगिरीला एकत्रितपणे उत्तर द्यायला हवे. चीन आणि युरोपीय संघाच्या हक्क आणि हेतूंचे रक्षण करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय समुदायात प्रामाणिक आणि न्याय कायम राखण्यासाठी हे आवश्यक आहे. असेही ते म्हणाले.
अमेरिकेने चीनवर लावलेल्या ३४ टक्के आयात शुल्कालाचीनने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ट्रम्प संतप्त झाले आहेत. त्यांनी आता चीनवर आणखीन आयात शुल्क लावले आहेत. त्यामुळे चीनवर अमेरिकेने लावलेल्या आयात शुल्काचे प्रमाण १४५ टक्के इतके झाले आहे. दुसरीकडे युरोपीय संघ आणि अन्य देशांवरील आयात शुल्काची अंमलबजावणी ट्रम्प यांनी ९० दिवसांसाठी स्थगित केली आहे.





