Kedarnath – मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या केदारनाथच्या मार्गाची दुरुस्ती पुर्ण करण्यात आली आहे आणि १५ दिवसांच्या अवकाशानंतर हा मार्ग यात्रेकरूंसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. या मार्गावर २९ ठिकाणी भूस्खलन झाले होते त्यामुळे हा १९ किमी मार्ग पुर्ण बंद करण्यात आला होता. सुमारे २६० मजुरांनी रात्रंदिवस काम करून यात्रेकरूंसाठी मार्ग दुरुस्त केला. ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने या मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाले होते त्यामुळे हजारो यात्रेकरू अडकून पडले होते. भारतीय हवाई दल आणि खाजगी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने भिंबळी आणि लिंचोलीसह मार्गावर अडकलेल्या ११ हजाराहून अधिक यात्रेकरूंना बाहेर काढण्यात आले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अनेक वेळा रुद्रप्रयाग जिल्ह्यातील आपदग्रस्त भागांना भेट देऊन संपूर्ण बचाव कार्याचे वैयक्तिकरित्या निरीक्षण केले.