भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर नितीन नबीन यांचे पहिले भाषण: पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत म्हणाले, ‘एखादी व्यक्ती लोकांच्या भावनांशी..’

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर नितीन नवीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोलाचा संदेश दिला. “आमच्यासाठी राजकारण ही सत्ता नसून साधना आहे आणि उपभोग नसून त्याग आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीचा गौरव –
नितीन नवीन यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले. ते म्हणाले, “आम्ही सामान्य कार्यकर्ते म्हणून नेहमीच लांबून पाहत आलो आहोत की, पंतप्रधान मोदी देशाच्या सेवेसाठी सातत्याने कसे कार्यरत आहेत.”
त्यांनी २००६ मधील एका आठवणीचा उजाळा दिला. गुजरातच्या आणंद येथील ‘सद्भावना मिशन’ कार्यक्रमाचा संदर्भ देत नवीन म्हणाले, “त्यावेळी मी राष्ट्रीय सरचिटणीस होतो. मोदीजी प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे किती शांतपणे ऐकून घेत होते, हे मी जवळून पाहिले. तो कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी ज्या भावूकतेने लोकांशी असलेल्या नात्याबद्दल सांगितले, तेव्हा मला उमजले की, जेव्हा एखादी व्यक्ती लोकांच्या भावनांशी जोडली जाते, तेव्हाच ती महान बनते.”
माजी अध्यक्षांच्या योगदानाचे स्मरण –
नवीन यांनी आपल्या भाषणात राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि अमित शाह यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या कार्याचा गौरव केला. “२००६ मध्ये मी आमदार झालो, तेव्हापासून राजनाथ सिंह यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला जोडण्याचे काम कसे केले, हे मी पाहिले आहे.” नितीन गडकरींबाबत बोलताना म्हणाले, “संघटनेचा प्रत्येक मोर्चा बांधण्याचे आणि त्याला आकार देण्याचे काम नितीन गडकरी यांनी केले.” अमित शाहांबाबत म्हणाल, “अमित शाह जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याची आस्थेने विचारपूस केली.”
कलम ३७० आणि राम मंदिराचा उल्लेख
पक्षाच्या ऐतिहासिक कामगिरीचा उल्लेख करताना त्यांनी अयोध्येतील राम मंदिर निर्माण आणि जम्मू-काश्मीरमधून ‘कलम ३७०’ हटवल्याचा आवर्जून उल्लेख केला. “जम्मू-काश्मीरमधील जनतेने हा सकारात्मक बदल प्रत्यक्ष अनुभवला आहे,” असेही ते म्हणाले.
कार्यकर्त्यांना संदेश
“आमच्या पक्षात राजकारण म्हणजे ऐशोआराम नसून तपस्या आहे आणि पद म्हणजे अधिकार नसून ते एक उत्तरदायित्व आहे,” असे सांगत त्यांनी आगामी काळात पक्षाला अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.





