अबू आझमींनंतर मुलगाही अडचणीत, गोव्यात केलं भाडंंण अन् पोलिसांनी केली कारवाई

Abu Azmi son Farhan Azmi | समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबचे कौतुक केल्यानंतर त्यांच्या राज्यभरातून टीका करण्यात आली. याप्रकरणी विरोधकांनी देखील त्यांना चांगलेच धारेवर धरले. यानंतर औरंगजेबावरील वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर स्पष्टीकरण देत अबू आझमी यांनी आपले वक्तव्य मागे घेत असल्याचे सांगितले.
मात्र एकीकडे अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच त्यांचा मुलगा आणि उद्योगपती अबू फरहान आझमी देखील अडचणीत सापडला आहे. अबू फरहान आझमीला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गाडी चालवण्यावरून दोन स्थानिकांशी वाद झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी हाणामारी करून शांतता भंग केल्याप्रकरणी दोन स्थानिक नागरिक आणि फरहान आझमी यांचा चालक शाम यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. कलंगुट पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आझमी त्यांचा अल्पवयीन मुलगा आणि चालक शाम मर्सिडिज एसयूव्ही वाहनातून प्रवास करत होते. सुपरमार्केटच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या वाहनातील प्रवाशांशी त्यांचा वाद झाला. आझमी यांच्या वाहनाने डाव्या बाजूला वळत असताना सिग्नल दिला नाही, असा आरोप मागच्या वाहनातील इसमाने केला. यावरून आझमी आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर स्थानिक लोक आणि मागच्या वाहनातील इसमाचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले.
गोवा पोलिसांनी एक निवेदन जाहीर करत म्हटले की, वादात सहभागी असलेल्या चारही लोकांना पोलीस ठाणयात आणण्यात आले. दोन्ही पक्षांना आपापली तक्रार दाखल करण्याची संधी दिली, मात्र दोघांनीही तक्रार दाखल करण्यास नकार दिला. अबू फरहान आझमी यांच्याकडे वादाच्यावेळी पिस्तूलही होते. त्याचा रितसर परवाना त्यांनी सादर केला. मात्र सहभागी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी भांडत असल्याने, सार्वजनिक शांतता भंग करत असल्याने आणि गोंधळ निर्माण करत असल्याने, कळंगुट पोलिस ठाण्याचे पीएसआय परेश सिनारी यांनी तक्रार दाखल केली.
परंतु, भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ३५ अनुसार तक्रार दाखल झाल्यानंतर चारही जणांना प्राथमिक चौकशीनंतर सोडून देण्यात आले.
हेही वाचा:





