बीडमध्ये मागील 5 वर्षात किती हत्या झाल्या? देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारीच दिली…

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे मागील काही महिन्यांपासून बीड जिल्हा राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे बीडची चर्चा सर्वत्र होत आहे. आता मागील 5 वर्षात बीडमध्ये किती हत्येच्या घटना घडल्या याबाबतची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात ही आकडेवारी दिली.
विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून राज्य व बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांबाबत विचारणा करण्यात आली होती. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात याबाबतची माहिती दिली.
एकट्या बीड जिल्ह्यात गेल्या 5 वर्षांत 276 जणांचे खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर 766 जणांच्या हत्येचा प्रयत्न झाला. जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या दहा महिन्यांच्या कालावधीत 36 गुह्यांच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. याशिवाय, जिल्ह्यातील एकूण 199 जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही महिन्यांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, वाल्मिक कराडला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.





