पुणे | तब्बल ५५ दिवसांनी प्रचारतोफा थंडावल्या

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- आरोप- प्रत्यारोप आणि आपल्या विकासकामांचे व्हिजन मांडत शहराच्या स्थानिक प्रश्नांवर रंगलेल्या पुणे लोकसभा मतदारासंघातील जाहीर प्रचार शनिवारी सायंकाळी थांबला. प्रचाराची वेळ संपण्यास अवघ्या १० ते १५ मिनिटे आधी शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली.
या निवडणुकीत सर्वाधिक ५५ दिवस प्रचाराला मिळाल्याने उमेदवारांनी शहर पिंजून काढले. यात शहरातील पाणी, वाहतूक कोंडी याच्यासह, स्थानिक मुद्द्यांचीच चर्चा झाली,
दुसऱ्या बाजूला भाजप आणि महायुतीकडून केंद्रातील तसेच राज्यातील दिग्गज नेत्यांची फौज पुण्याच्या प्रचारात उतवित आघाडी घेतलेली असतानाच दुसऱ्या बाजूला काॅग्रेसकडूनही राज्यातील डझनभर आमदार पुण्यात मुक्कामी ठेवत शेवटच्या तीन दिवसात केंद्रीय पातळीवरील नेत्यांच्या ठराविक वर्गांसाठी बैठका घेत शेवटच्या टप्प्यात प्रचारात चुरस आणली. त्यामुळे एकहाती विजयाची आशा असलेल्या भाजपसमोर आव्हान उभे झाले आहे.
यंदाची निवडणूक खऱ्या अर्थाने पुणेकरांच्या प्रश्नावर चर्चेत आली. मागील दोन वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक असल्याने नागरिकांना पाणी, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याचे पडसाद या निवडणुकीत दिसून आले. प्रचारासाठी आलेल्या उमेदवारांनाही याच प्रश्नांचा सामना करावा लागला.
त्याचवेळी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले असले, तरी भाजपच्या नेत्यांकडून संपूर्ण प्रचारात ही निवडणूक मोदी विरोधात राहूल गांधी असल्याचा प्रचार केला. तर काॅग्रेस नेत्यांकडून प्रचाराच्या शेवटच्या दिवसा पर्यंत महागाई आणि संविधानात बदल केला जाणार असल्यावरच भर दिल्याचे पहायला मिळाले.
नेत्यांच्या सभांनी भरला रंग
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काॅग्रेस नेते राहूल गांधी यांच्या सभांनी पुण्यात रंगल आणली. दि. १८ एप्रिलनंतर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू झाल्याने त्यानंतरच प्रचारात रंगत आली.
२८ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात रेसकोर्स येथे सभा झाली तर ३ मे रोजी राहूल गांधी यांची एसएसपीएमएस मैदानावर सभा झाली. या दोन्ही सभांना मोठी गर्दी झाली होती. तर, या सभा नंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अधिक आक्रमकपणे प्रचारात सहभागी झाल्याचे पहायला मिळाले.





