Asia Cup 2025 : भारताला आशिया कपमध्ये ‘या’ पठाण गँगपासून राहावे लागणार सावध, कधीही करु शकते मोठा उलटफेर

अफगाणिस्तानचा मोठा पराक्रम –
आशिया कपपूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएई यांच्यात टी-20 स्वरूपाची तिरंगी मालिका खेळली जात आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला 18 धावांनी पराभूत केले. यापूर्वीच्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला होता, त्यामुळे त्यांच्याकडून पुन्हा विजयाची अपेक्षा होती. परंतु, राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने पाकिस्तानला धक्का देत भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांना कडक संदेश दिला आहे. या विजयाने अफगाणिस्तानने सिद्ध केले की, आशिया कपमध्ये ते मोठा उलटफेर करू शकतात.
अफगाणिस्तानचा शानदार इतिहास –
अफगाणिस्तानने यापूर्वीही जागतिक क्रिकेटमध्ये मोठे पराक्रम केले आहेत. 2024 च्या टी-20 विश्वचषकात त्यांनी ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी पराभूत करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. ही त्यांच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात संस्मरणीय विजयांपैकी एक होती. याच स्पर्धेत त्यांनी न्यूझीलंडलाही हरवले होते. तसेच, 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानने श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांना पराभूत केले होते. अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये त्यांनी इंग्लंडला पुन्हा एकदा मात देऊन आपली ताकद दाखवली.
भारत-अफगाणिस्तान सामना शक्यता –
आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघ ग्रुप ए मध्ये, तर अफगाणिस्तान ग्रुप बी मध्ये आहे. त्यामुळे गट साखळी सामन्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये थेट लढत होणार नाही. परंतु, क्वालिफायर फेरीत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला अफगाणिस्तानविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल, अन्यथा हा संघ मोठा उलटफेर करू शकतो. भारताला या स्पर्धेत सावध खेळ खेळून अफगाणिस्तानच्या आव्हानाला तोंड द्यावे लागेल, कारण ही ‘पठाण गॅंग’ कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता बाळगते.





