Afghan Taliban : अफगाण तालिबानकडून पाक चौक्यांवर पुन्हा गोळीबार; पाकचा एक सैनिक ठार, ११ जखमी

इस्लामाबाद : अफगाण तालिबानने आज पुन्हा सीमेवर केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे ११ सैनिक जखमी झाले. सीमेवरील पाकिस्तानच्या चौक्यांवर तालिबानकडून हा गोळीबार करण्यात आला. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तालिबानने सलग दुसऱ्या दिवशी सीमेवरच्या पाक चौक्यांवर गोळीबार केला आहे.
अप्पर कुर्रम जिल्ह्यातल्या सीमेवरच्या चौक्यांवर हा चिथावणी देणारा गोळीबार करण्यात आला. तालिबानने गोझरही, माथा सांगर, कोट राघा आणि तारी मेंगल या ठिकाणच्या चौक्यांवर हलक्या आणि अवजड अशा दोन्ही शस्त्रांनी हा गोळीबार केला, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानच्या बाजूनेही या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. या प्रत्युत्तरामध्ये अफगाणीस्तानच्या बाजूचे ७ ते ८ जण मारले गेले. मात्र पाकिस्तानच्या फ्रॉन्टियर कॉन्स्टॅब्युलरीचा एक सैनिक ठार झाला आणि ११ सैनिक जखमी झाले, असेही सूत्रांनी म्हटले आहे.
पाकिस्तानने अलिकडेच अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातल्या टीटीपीच्या तळांवर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात ५० महिला आणि मुले मारली गेल्याचे तालिबानने म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कालही तालिबानने पाक चौक्यांवर केलेल्या माऱ्यात पाकिस्तानचे १९ सैनिक ठार झाले होते. अफगाणिस्तानमध्ये २०२१ तालिबानने सत्ता ताब्यात घेतली. तेंव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध खालावले आहेत.
अफगाणिस्तानच्या हद्दीतून टीटीपी ही दहशतवादी संघटना पाकिस्तानात घातपाती कारवाया करत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून सातत्याने केला जातो आहे. टीटीपीवर कारवाई करण्यासाठी पाकने तालिबानला वारंवार सांगितले. मात्र तालिबानकडून टीटीपीवर कोणतीही कारवाई केली नाही. उलट पाकिस्तानच्या खैबरपख्तुनक्वा प्रांतात टीटीपीकडून जवळपास दररोजच दहशतवादी हल्ले केले जात आहेत.
पाक हद्दीत घुसखोरीचाही प्रयत्न
शुक्रवारी दहशतवाद्यांनी अफगाण तालिबानच्या ताब्यातल्या चौक्यांमधून पाक हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र पाक सैनिकांनी घुसखोरीचा हा प्रयत्न अपयशी ठरवला होता. यावेळी झालेल्या जोरदार धुमश्चक्रीमध्ये अफगाणिस्तानच्या बाजूचे किमान १५ दहशतवादी मारले गेले आणि इतर अनेक जण जखमी झाले होते, घुसखोरीच्या या प्रयत्नानंतर अफगाणी सैन्याने आपल्या चौक्या सोडून दिल्या होत्या, असेही सूत्रांनी म्हटले आहे.




