पुणे जिल्हा | विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणसाठी अॅड. काळेंचा अट्टहास

नारायणगाव, (वार्ताहर) – जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. संजय काळे यांनी सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान फार मोठे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा ध्यास घेऊन शिक्षणातून प्रगती साधावी यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे असा त्यांचा नेहमी अट्टहास असतो, असे प्रतिपादन जुन्नर तालुका पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुभाष कवडे यांनी केले.
अॅड. संजय काळे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जुन्नर तालुक्यातील सेवकांच्या वतीने जुन्नरमधील अण्णासाहेब आवटे विद्यालयातील गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना 101 डझन वह्यांचे वाटप करण्यात आले.
तर जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे कै. बन्सीलाल मोहनदास मुथ्था मूकबधिर विद्यालयात जुन्नर तालुक्यातील गट सचिव संघटनेच्या वतीने शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्याचे वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले, त्यावेळी कवडे बोलत होते.
याप्रसंगी श्री शिवाजी मराठा शिक्षण संस्था (शिवनेर) शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास चव्हाण, उपाध्यक्ष अॅड. निलेश गुंजाळ, सचिव अविनाश पुंडे, तालुका विभागीय अधिकारी बाळासाहेब मुरादे, विशेष वसुली अधिकारी संदीप जाधव, विकास अधिकारी प्रसाद कोल्हे, वसंत ताजणे, अमित जाधव, स्वाती वाव्हळ, जयेश गाढवे, विलास औटी, अब्दुल सय्यद, रजत मुरादे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक आदी उपस्थित होते.
अॅड. काळे यांच्या कर्तृत्वातून…
अॅड. संजय काळे यांच्या कर्तृत्वातून जुन्नर येथील शिवछत्रपती महाविद्यालयास जून 2018 ला. ए प्लस दर्जा प्राप्त झाला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा ध्यास घेऊन शिक्षणातून प्रगती साधावी यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे असा त्यांचा नेहमी अट्टहास असतो.
अॅड. संजय काळे राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक असून चार टर्म संचालकपदी काम करीत असताना अजित पवार यांनी त्यांच्यावर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती, असे संजय कवडे यांनी नमूद केले.





