CJI बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील सुटला; कोणतीही कारवाई होणार नाही, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : भारताचे मुख्य न्यायाधीश (CJI) बी.आर. गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या 71 वर्षीय वकिलाला पोलिसांनी चौकशीनंतर सोडून दिले आहे. या घटनेवर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे.
पोलिसांनी तीन तासांच्या चौकशीनंतर वकील राकेश किशोर यांना मुक्त केले. न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांनी दिल्ली पोलिसांना वकिलाचे बूट आणि जप्त कागदपत्रे परत देण्याचे आदेश दिले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “रजिस्ट्रार जनरल यांच्या संमतीनंतर दिल्ली पोलिसांच्या सुरक्षा विभागाने आणि नवी दिल्ली जिल्हा पोलिसांनी वकिलाची चौकशी केली.”
बार कौन्सिलकडून निलंबन –
या घटनेनंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाने राकेश किशोर यांचे वकिलीचे परवाने तात्काळ निलंबित केले आहे. बार कौन्सिलचे अध्यक्ष आणि भाजप खासदार मनन कुमार मिश्रा म्हणाले, “ही अतिशय लाजिरवाणी आणि दुर्दैवी घटना आहे. यामुळे देशातील सर्व वकील समुदायाची मान झुकली आहे. आमचे CJI देखील सनातनी आहेत, ते मंदिरात जातात. अशा प्रकारची कृत्ये असह्य आहेत.”
Bar Council of India suspends advocate Rakesh Kishore from practice in courts with immediate effect after he attempted to hurl a shoe at Chief Justice of India BR Gavai.
— ANI (@ANI) October 6, 2025
वकिलाकडे सापडला ‘सनातन’ संदेश –
चौकशीदरम्यान पोलिसांना वकिलाकडून एक पांढऱ्या कागदावर लिहिलेला संदेश सापडला. त्यात लिहिले होते – “माझा संदेश प्रत्येक सनातनीसाठी आहे… सनातन धर्माचा अपमान हिंदुस्तान सहन करणार नाही.” तसेच त्याच्याकडे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन, शाहदरा बार असोसिएशन, आणि दिल्ली बार कौन्सिल यांचे ओळखपत्रही आढळले.
न्यायालयात घडली घटना –
पोलिसांच्या माहितीनुसार, मयूर विहार येथील रहिवासी आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचा सदस्य असलेला राकेश किशोर हा कोर्ट क्रमांक १ मध्ये सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान सकाळी सुमारे ११.३५ वाजता आपल्या बुटांपैकी एक बूट काढून CJI गवई यांच्या दिशेने फेकला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याला पकडले आणि सुरक्षा विभागाकडे सोपवले.
चौकशीदरम्यान वकिलाने सांगितले की, मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिरातील भगवान विष्णूच्या मूर्तीच्या पुनर्स्थापनेबाबत दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान CJI यांनी केलेल्या टिप्पणीनंतर तो असमाधानी होता, त्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले.
या घटनेनंतर न्यायालयीन वर्तुळात मोठी खळबळ माजली असून, CJI गवई यांनी स्वतः कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतल्याने प्रकरण शांत झाले आहे.





