Priyanka Gandhi : सल्लागार बहुधा मोदींना चुकीचे सल्ले देत आहेत; प्रियंका गांधीची टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गांधी परिवारातील सदस्यांना ईडी चौकशीच्या सत्राला सामोरे जावे लागत आहे. त्यावरून कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले. मोदींना बहुधा त्यांचे सल्लागार चुकीचे सल्ले देत आहेत. राजकीय कारणांसाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचे जनतेला ठाऊक आहे, असे त्या म्हणाल्या.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने नुकतेच कॉंग्रेसच्या सोनिया आणि राहुल गांधी या माजी अध्यक्षांविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्याशिवाय, प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांची हरियाणातील जमीन व्यवहार प्रकरणी चौकशी करण्यात आली. त्या घडामोडींवर पत्रकारांशी बोलताना प्रियंका यांनी भाष्य केले. मीही ईडीच्या निमंत्रणाची प्रतीक्षा करत आहे. मला अद्याप समन्स बजावण्यात आले नसल्याचे आश्चर्य वाटते, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.
यंग इंडियन कंपनीच्या माध्यमातून नॅशनल हेराल्डची कोट्यवधी रूपयांची मालमत्ता बळकावण्याचा सोनिया आणि राहुल यांचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. तो आरोप प्रियंका यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळला. कुणीच ती मालमत्ता विकू शकत नाही. तसेच, वारसदारांकडे किंवा इतरांकडे हस्तांतरित करू शकत नाही. त्यांच्या नावावरही ती मालमत्ता नाही. तसे असताना मालमत्ता बळकावण्याचा आरोप कसा काय होऊ शकतो? संबंधित आरोप म्हणजे निव्वळ खोटेपणा आहे. माझे पती रॉबर्ट वाड्रा यांना पुन्हा-पुन्हा चौकशीला बोलावून असंबद्ध स्वरूपाचे प्रश्न विचारले जात आहेत.
तुम्ही तुमच्या आईला १७ वर्षांपूर्वी ४ लाख रूपये का दिले, असे ते प्रश्न आहेत. माझ्या कुटूंबातील सर्व सदस्य चौकशीकामी यंत्रणांना सहकार्य करत आहेत. बहुधा मोदींची रणनीती काम करताना दिसत नाही, अशी शाब्दिक टोलेबाजीही त्यांनी केली. भाजपच्या खासदार बांसुरी स्वराज संसदीय समितीच्या बैठकीत एक बॅग घेऊन पोहचल्या. त्या बॅगेवर नॅशनल हेराल्डची लूट असे लिहिले होते. त्याविषयी पत्रकारांनी विचारल्यावर प्रियंका यांनी गंमतीदार प्रतिक्रिया दिली. बांसुरी यांची कृती मला मजेदार वाटली. मी त्यांना बॅगविषयी विचारलेही. त्यांनी केवळ स्मितहास्य केले. त्यांनी बॅगेत लूट ठेवली होती का, असा मिश्कील प्रतिसवाल त्यांनी केला.





