शिवसेना भाजपमध्ये विलीन करण्याचा सल्ला? शाह-शिंदेंच्या भेटीवरून संजय राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांची महायुती सरकारमध्ये कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. याचदरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून केंद्रीय मंत्री अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून मोठा दावा केला आहे.
संजय राऊत यांनी लिहिले की, एकनाथ शिंदे यांनी शनिवारी २२ फेब्रुवारीला पहाटे पुण्यातील कोरेगाव पार्कमधील वेस्टइन हॉटेलला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही. कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत हे सांगण्यासाठी शिंदे पहाटे ४ वाजता शाहांना भेटले.
तसेच या भेटीत एकनाथ शिंदे यांनी माझी आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे उघडपणे प्रयत्न सुरू आहेत अशी तक्रार केली. त्यावर मी देवेंद्रशी बोलतो असं शाह म्हणाले, त्यानंतर मी तुमच्यावर विश्वास ठेवून भाजपासोबत आलो, निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री करणार असं तुम्ही वचन दिले होते असं शिंदेंनी सांगितले. त्यावर आमचे १२५ लोक निवडून आलेत, मग तुम्ही दावा कसा करू शकता असा सवाल शाह यांनी शिंदेंना विचारला. त्यावर माझ्या नेतृत्वात निवडणूक झाली होती असं शिंदे म्हणताच शाह बोलले, नाही, मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली होती असं उत्तर एकनाथ शिंदेना दिल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं.
भाजपात विलीन व्हा…
निवडणुकीनंतरही मी मुख्यमंत्री राहीन, असे तुमचे वचन होते, असेही त्यांनी सांगितले. यावर गृहमंत्री शहा यांनी आमचे १२५ लोक निवडून आले, मग तुम्ही कसा काय दावा करू शकता? असे सांगितले. तुम्हाला काय हवे आहे ते सांगा. मी प्रयत्न करेन, असे शिंदे यांना विचारले. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची मागणी केली असता मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल, तुम्ही भाजपमध्ये विलीन व्हावे. तेव्हा तुमचा मुख्यमंत्रीपदावरील दावा कायम राहील, त्यानंतर या दोन नेत्यांची बैठक संपली हे भाजपाच्या लोकांनीच सांगितले असा दावा संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातून केला आहे.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाहांनी फोडली, ती शिंदेंच्या हातावर ठेवली. आज शिंदेंना मुख्यमंत्री पुन्हा व्हायचे म्हणून ती चोरलेली शिवसेना भाजपामध्ये विलीन करायला निघाले असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.
हेही वाचा:





