शशिकलांच्या विरोधात अद्रमुकची पोलिसांकडे तक्रार

चेन्नई – अद्रमुकमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्या शशिकला 8 फेब्रुवारीला कर्नातकातून तामिळनाडूला परतणार आहेत. त्या पार्श्वभुमीवर अद्रमुकने त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. हिंसाचार घडवण्याचा कट केल्याचा आरोप अद्रमुकच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून राज्यात शांतता राखण्यासाठी कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
दरम्यान अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघमचे प्रमुख आणि शशिकला यांचे पुतण्या दिनकरन यांनी हिंसाचाराच्या कटाचे आरोप फेटाळले आहेत. हे आरोप म्हणजे बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनीही कायद्याविरोधातील कोणतीही कृती न करण्याचा इशारा दिला आहे.
शशिकला या भ्रष्टाचाराच्या आरोपात बेंगळूरुतील तुरुंगात होत्या. त्यांची शिक्षेची मुदत पूर्ण झाली असून त्या करोनाच्या संसर्गातूनही आता बऱ्या झाल्या आहेत. उद्या त्या बेंगळूरुतून तामीळनाडूला परत येणार आहेत. त्या आणि दिनाकरन तामीळनाडूमध्ये हिंसाचार घडवणार असल्याने नागरिकांचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या हेतूने पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असल्याचे कायदा मंत्री सी.वी.शण्मुगम यांनी सांगितले.
दिनकरन आणि त्यांचे समर्थक प्रक्षोभक वक्तव्ये करत आहेत आणि हिंसाचाराला चिथावणी देत आहेत, असे अन्य एक मंत्री ई मधुसुधन यांनीही सांगितले. तर पक्षाचा ध्वज वापरण्यापासून आपल्याला कोणीही अडवू शकत नाही, असे दिनकरन यांनी म्हटले असल्याचे त्यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतल्यानंतर सांगितले.
दरम्यान मुख्यमंत्री के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या अध्यक्षतेखाली अद्रमुकची उच्चस्तरिय बैठक पार पडली. तामीळनाडूमध्ये एप्रिल, मे महिन्यात विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये अद्रमुकच्या विजयासाठी दोन्ही नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना सांघिकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले असल्याचे अद्रमुकने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या बैठकीमध्ये शशिकला यांच्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अद्रमुकच्या प्रवक्ते आणि माजी मंत्री वैगाइचेल्वन यांनी पत्रकारांना सांगितले. पक्षातील कोणी जर शशिकला यांची भेट घेतली तर त्या व्यक्तीला पक्षातून काढोन टाकले जाईल, असेही त्यांनी सांगितले.





