घोषणा करूनही प्रवेशाचे वेळापत्रक गुलदस्त्यात; सीईटी सेलच्या ढिसाळ नियोजनाचा फटका

पुणे – राज्य सीईटी सेलमार्फत पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रत्यक्ष प्रवेशफेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. मात्र, दोन दिवसानंतरही प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले नाही. त्यामुळे या ढिसाळ नियोजनाचा फटका लाखो विद्यार्थी व पालकांना सहन करावा लागत आहे.
मुंबई येथील राज्य सीईटी सेलच्या वतीने बी.ई.-बी.टेक., फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, एम.बी.ए., एम.सी.ए., तीन व पाचवर्षीय विधी, बी.एड., एम.एड., एम.पीएड. या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया होत असते. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्यात आली. निकालही जाहीर झाला. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक दि. 15 ते 26 जून या कालवधीत जाहीर करण्यात येत असल्याचे राज्य सीईटी सेलकडून सांगण्यात आले. एवढेच नव्हे, यासंदर्भात 9 जून रोजी परिपत्रक प्रसिद्ध केले.
दरम्यान, कोणत्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक कधी जाहीर होणार आहे, अर्ज नोंदणी याची सर्व माहितीही तारखांनिहाय प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे आता वेळेनुसार सर्व प्रवेशप्रक्रिया सुरू होईल, अशी अपेक्षा विद्यार्थी व पालकांची होती. त्यासाठी राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर विद्यार्थी वेळावेळी भेटी देऊन प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले का, याची माहिती घेत होते. मात्र, अद्यापही ही माहिती देण्यात आली नाही.
स्पष्टीकरण अपेक्षित
राज्य सीईटी सेलने दि. 15 जून रोजी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होणार असल्याचे सांगितले. यातील पाचवर्षीय विधी व बीए-बीएस्सी बीएड अभ्यासक्रम वगळता अन्य प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. तांत्रिक कारणामुळे दि. 15 जूनला वेळापत्रक प्रसिद्ध होऊ शकले नसावे. दुसऱ्या दिवशी तरी वेळापत्रक प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्यापही प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले नाही. या प्रक्रियेस उशीर होत असेल तर तशी माहितीही प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे. मात्र, काहीच माहिती दिली जात नसल्याचा आरोप होत आहे.
अर्ज नोंदणीसाठी केवळ प्रतीक्षाच
दि. 16 ते 26 जून रोजी होणाऱ्या रोजी प्रसिद्ध होणारे वेळापत्रकाचे नियोजनही कोलमडणार असल्याची शक्यता आहे. दि. 16 जूनच्या नियोजित प्रवेशाचे वेळापत्रकही अद्यापही प्रतीक्षेत आहेत.





