कौतुकास्पद ! अभिनेता रवी किशन यांची लेक 21 व्या वर्षी होणार सैन्यात भरती

मुंबई – बॉलीवूडचे स्टारकीड्स नेहमची चर्चेत राहिले आहेत. अनेक स्टारकीड्स पालकांप्रमाणे सिनेसृष्टीकडे वळतात. मात्र एका प्रसिद्ध अभिनेत्याची लेक भारतीय सैन्यात भरती होणार आहे. त्या अभिनेत्याच नाव आहे रवी किशन. अभिनेत्यासह रवी किशन हे भाजपचे खासदारही आहेत. रवी किशन यांची मुलगी इशिता शुक्ला अवघ्या 21 व्या वर्षी अग्निपथ योजनेअंतर्गत संरक्षण दलात सामील होणार आहे.
इशिता दिल्ली डायरेक्टोरेटच्या ‘७ गर्ल बटालियन’ची कॅडेट आहे. याबाबत रवी यांनी ट्वीट करत आनंद व्यक्त केला होता. यावर्षी २६ जानेवारी रोजी तिने परेडमध्ये भाग घेतला होता. आता इशिता लवकरच सैन्यात भरती होणार आहे. सध्या इशिताचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. दरम्यान, रवी किशन यांना इशिताव्यतिरिक्त रिवा, तनिष्क आणि सक्षम अशी तीन मूलं आहेत. रिवाला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे असून तिने अमेरिकेत अभिनयाचे शिक्षण घेतले आहे.
अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींची मुलं ही मनोरंजन विश्वात आपलं करिअर घडवण्यासाठी आल्याचे दिसून आले. पण तिनं सैन्य दलाची निवड केल्याने तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेकदा बॉलीवूडवर घराणेशाहीवरून टीकाही करण्यात आली आहे. दरम्यान, रवी किशन यांची भोजपुरी स्टार म्हणून ओळख आहे. त्यांनी तेलगू आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्यांचे ‘फिर हेरा फेरी’, ‘वेलकम टू सज्जनपूर’, ‘किक 2’ हे चित्रपट चांगलेच गाजले.





