महिनाभरात चौथ्यांदा प्रशासकीय उलथापालथ

ससून रुग्णालय नियंत्रणाचे अधिकार डॉ. म्हैसेकरांकडून काढले
करोनाच्या काळात जमाबंदी आयुक्त; एस. चोक्कलिंगम यांच्याकडे जबाबदारी
पुणे – पदभार बदलूनही बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयातील करोनामुळे होणारा मृत्यूचा आकडा वाढतच आहे. त्यात गेल्या महिनाभरात तीनवेळा ससूनचा पदभार आणि अधिकारात बदल करण्यात आले आहेत. आता चौथ्यांदा ससून रुग्णालय नियंत्रणाचे सर्व प्रशासकीय अधिकार विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून काढून जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे गुरुवारी देण्यात आले.
शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने डॉ. नायडूसह ससून रुग्णालयात बाधित रुग्णांना दाखल करण्यास सुरुवात झाली. नायडू रुग्णालयात व्हेंटिलेटरची सुविधा नसल्यामुळे अत्यवस्थ रुग्णाला तात्काळ ससून रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र, रुग्ण शेवटच्या घटकेला दाखल होत असल्यामुळे ससूनमधील मृत्यूचा आकडा झपाट्याने वाढत गेला. त्यातच राजकीय षड्यंत्रात तत्कालिन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बदली झाली. त्यानंतर अधिष्ठाताचा पदभार डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे सोपवण्यात आला. मात्र, बै. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचे नियंत्रण आणि प्रशासकीय यंत्रणांचे अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना देण्यात आले होते.
एवढं करूनही मृत्यूचा कहर थांबेना की काय, म्हणून पुन्हा हे अधिकार बदलून जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचे आदेश उपसचिव संजय कमलाकर यांनी दिले. डॉ.चंदनवाले यांच्या बदलीनंतर अधिष्ठातापदाची सूत्रे हाती घेतलेल्या डॉ. तांबे यांच्याकडे आर्थिक अधिकार देण्यात आले होते. ते अधिकार या आदेशाने कायम ठेवले आहेत.
दरम्यान, अधिकारी बदलल्याने करोनामुळे होणारा ससूनमधील मृत्यूचा कहर थांबेल का, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.





