Pimpri : धोकादायक पाइप वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

लोणावळा : जुन्या पुणे – मुंबई महामार्गावरील बोर घाटात अवघ्या चार दिवसांपूर्वी पाइप अंगावर पडून दोन महिलांचा करुण अंत झाल्याची भीषण घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा त्याच घाटातून अत्यंत धोकादायक पद्धतीने पाइपची वाहतूक करणारे ट्रक सर्रासपणे धावताना दिसत आहेत. कोणत्याही सुरक्षा उपाययोजनांशिवाय सुरू असलेल्या या जीवघेण्या वाहतुकीकडे पोलीस प्रशासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष नागरिकांच्या संतापाला कारणीभूत ठरले आहे.
चार दिवसांपूर्वीच्या अपघाताची दाहकता मोठी होती, त्यात निष्पाप जीव गेले. तरीही प्रशासन यातून कोणताही धडा घेतल्याचे दिसत नाही. नियमानुसार अशा धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर, त्यांच्या चालकांवर आणि मालकांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, नागरिकांच्या जिवाशी सुरू असलेला हा खेळ प्रशासनाच्या उदासीनतेची स्पष्ट साक्ष देत आहे. बोर घाटातील तीव्र उतार आणि पाइपची योग्य बांधणी नसणे यामुळे पाइप घसरण्याचे प्रकार सर्रास घडत असतात.
प्रशासकीय नियमांनुसार अशा वाहनांवर पूर्ण बंदी घालता येत नसली तरी, यावर मार्ग काढत काहीतरी ठोस निर्बंध घालणे आवश्यक आहे. खोपोली-खालापूर परिसरात विविध दुर्घटना आणि अपघातांमध्ये बचाव कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे हेल्प फाउंडेशन या विषयावर सातत्याने प्रशासनाला सूचना देत आहे आणि मदतही करत आहे.
मात्र, प्रशासनानेही आपली जबाबदारी ओळखून आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा, ‘ये रे माझ्या मागल्या’ या उक्तीप्रमाणे पुन्हा एखादा भीषण अपघात होणार, पुन्हा कोणाचा तरी जीव जाणार आणि यावर केवळ चर्चाच होणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने आतातरी डोळे उघडून तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.





