पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकांवर प्रशासनाची वक्रदृष्टी पडली आहे. या स्वीय सहायकांना बिनकामी ठरवत त्यांना करोनाची ड्यूटी बजाविण्याचे आदेश दिल्यामुळे आश्वर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे 67 टक्के घरी बसलेल्या कर्मचाऱ्यांना न बोलविता थेट पदाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक हटविल्याने पडद्यामागे मोठे राजकारण शिजल्याचीही चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत कार्यरत असलेल्या महापौर, उपमहापौर, सत्ताधारी पक्षनेते, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती पासून प्रत्येक समितीच्या पदाधिकाऱ्यांना नगरसचिव विभागामार्फत आवश्यक ते कर्मचारी उपलब्ध करून दिले जातात. पदाधिकारी आप-आपल्या विश्वासातील अथवा आवडीचे कर्मचारी आपल्या कार्यकाळात नियुक्त करतात. संबंधित पदाधिकारी जो पर्यंत कार्यरत आहे तो पर्यंत त्या कर्मचाऱ्याची बदली केली जात नाही असा आजपर्यंतचा संकेत आहे. मात्र हा संकेत पायदळी तुडवित पदाधिकाऱ्यांच्या स्वीय सहायकांना करोनाच्या ड्युट्या लावण्यात आल्या आहेत.
करोनाच्या काळातही सगळेच्या सगळे स्वीय सहायक महापालिकेत रोजच येत होते. मात्र “त्यांना’ करोनाची ड्यूटी का नाही? असा प्रश्न काहीजणांनी उपस्थित केल्यामुळे या स्वीय सहाय्यकांना वायसीएममध्ये 14 दिवस काम करावे लागणार आहे. काही पदाधिकाऱ्यांनी याला विरोध केला मात्र प्रशासनाने पदाधिकाऱ्यांच्या मागणीची दखल न घेता स्वीय सहाय्यकांना वायसीएममध्ये हजर राहण्याचे आदेश बजाविल्याने पदाधिकारी नव्हे तर “हम करे सो कायदा’ याचीच प्रचिती प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना आणून दिली आहे.