Satara | जिल्हा रुग्णालयातचा उरफाटा कारभार

सातारा, {मयूर सोनावणे} – सातारा जिल्हा रुग्णालयात आता केसपेपर काढण्यासाठी टोकण पद्धत सुरु करण्यात आली आहे. मात्र या टोकणपद्धतीच्या प्रक्रियेत सर्वसामान्य रुग्णांसह नातेवाईकांची प्रचंड हेळसांड होऊ लागली आहे. आधी फक्त केसपेपरसाठी रांगेत उभे रहावे लागत होते.
परंतु आता टोकण काढण्यासाटी रांगेत उभे रहायचे त्यानंतर ते टोकण घेऊन पुन्हा केसपेपर काढण्यासाठी रांगेत उभे रहावे लागत आहे.
या नव्याने सुरु करण्यात आलेल्या टोकणपद्धतीमुळे रुग्णांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने ही प्रक्रिया बंद करण्याची मागणी संतप्त रुग्णणांसह नातेवाईकांमधून होत आहे.
दिवसेंदिवस वाढण्या महामागाईबरोबर खासगी रुग्णायातील उपचारही प्रचंड महागला आहे. त्यामुळे गरीब असो अथवा श्रीमंत बहुतांश लोक आजारपणात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येच जाणे पसंत करत आहेत. किरकोळ आजारपण असेल तर स्थानिक ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार मिळत आहेत.
मात्र, गंभीर आजारपण असेल अथवा दुखापत असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्राचाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आता नेहमीच गर्दी पहायला मिळत आहे.
रुग्णांना जरी जिल्हा रुग्णालयाचा आधार वाटत असला तरी येथील अधिकार्यांसह कर्मचार्यांना रोजची वाढणारी गर्दी पाहून कदाचित तळपायाची आग मस्तकात जात आहे. त्यामुळेच आता केसपेपर काढण्यासाठीचा साधा सोपा असलेला मार्गही टोकणपद्धत सुरु करुन अडचणींचा करण्यात आला आहे.
केसपेपरसाठी सुरु केलेल्या टोकणपद्धीसाठी रुग्णांच्या जवळ अत्याधुनिक मोबाईल असणे आवश्यक आहे. रुग्णांची माहिती संबंधित अॅपमध्ये भरुन घेतल्यानंतर रुग्णांच्या मोबाईलवर ओटीपी येत आहे. हा ओटीपी सांगितल्यानंतर संबंधितांकडून रुग्णांना टोकण नंबर दिला जात आहे.
तो टोकण नंबर घेऊन पुन्हा रुग्णांना केसपेपरच्या रांगेत उभे रहावे लागत आहे. संबंधित टोकण नंबर सांगितल्यानंतर रुग्णांना केसपेपर मिळत आहे. पुन्हा तो केसपेपर घेऊन डॉक्टरांच्या ओपीडीसमोरील रांगेचा सामाना रुग्णांना करावा लागत आहे.
या सर्वप्रक्रियेमुळे रुग्णांसह नातेवाईक पूर्णत: वैतागून गेले आहेत. मात्र जिल्हा रुग्णालय प्रशासनासह लोकप्रतिनिधी असोत अथवा एरव्ही घसा काढणार्या सामाजिक संघटना यांना कुणालाही याबाबत काहीही देणंघेणं राहिलेले नाही, अशीच सध्याची अवस्था आहे.





