आदित्य ठाकरेंचा रोकठोक सवाल,’विकास अदानी समूहाचा होतोय की धारावीचा?’

मुंबई । शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे विधिमंडळाच्या अधिवेशनात मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाचा मुद्दा मांडला. याच मुद्यावरून माध्यमांशी बोलतांना त्यांनी महायुती सरकारवर संताप व्यक्त केला. धारावी झोपडपट्टी पुनर्विकासावरून सत्ताधारी महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभारावर असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
आदित्य आठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला की, धारावी पुनर्विकास कोणासाठी आहे? हा विकास अदानी समूहाचा होतोय की धारावीचा? कुठल्याही उद्योगपतीला आमचा विरोध नाही. काही चांगलं काम करत असेल, तर विरोध नाही. पण आज ईस्ट इंडिया कंपनीपेक्षाही भयानक प्रकार हा मुंबईत आणि महाराष्ट्रात सुरू आहे. मुंबईत सध्या चार की पाच टाउन प्लॅनिंग अथॉरिटी आहेत. आमचं स्वप्न आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर मुंबई महापालिकेलाच टाउन प्लॅनिंग अथॉरिटी करू. पण धारावीमध्ये एखादी परवानगी घ्यायची असेल किंवा प्रस्तावित योजना असेल तर टाउन प्लॅनिंग अथॉरिटी, डीआरपी, मुंबई महापालिका किंवा एमएमआरडीए यांनी 15 दिवसांत अदानी समूहाला उत्तर दिले नाही तर अदानी समूह म्हणेल, अदानी म्हणतील तेच खरं ठरेल आणि तसंच केलं जाईल, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला.
ते पुढे म्हणाले,’ देशात अनेक पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत. पण कोणाला अशा सवलती मिळाल्या नाहीत. मिहिर कोटेचा जे सतत खोटं बोलत असतात तेच म्हणाले आम्ही लोकसभा निवडणुकीच्या आधी जीरआर रद्द करून घेऊ. स्थानिकांनीही आंदोलन केलं होतं. कुर्ल्यांमध्ये राहणाऱ्यांचा धारावीच्या पुनर्विकासाला विरोध नाही. मुलुंडच्या नागरिकांचाही धारावीकरांना किंवा धारावीच्या पुनर्विकासाला विरोध नाही. मुद्दा हा आहे की ज्या जमिनी दिल्या जात आहेत, मिठागरं, डंम्पिंग ग्राउंड, ऑक्ट्राय नाका असेल कुर्ल्यातील मदर डेअरीचा प्लॉट असेल किंवा मुलुंडमध्ये जे प्लॉट दिलेले आहेत ते किती वर्षे तुम्ही अदानी समूहाला देणार आहात? असा थेट सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.





