Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल, केजरीवाल यांची भेट; दिल्लीत हितगुज

नवी दिल्ली : ठाकरेसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी देशाची राजधानी दिल्लीचा दौरा केला. त्या दौऱ्यात त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. त्या भेटीगाठींमधून विरोधकांच्या एकजुटीचा, निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेसाठीचा लढा मजबूत बनवण्याचा संदेश दिला गेला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीत नुकत्याच झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला.
त्यावरून ठाकरेसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचा समावेश असणाऱ्या महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर, आदित्य यांच्या दिल्ली दौऱ्याचे आणि त्यांनी घेतलेल्या भेटीगाठींचे महत्व वाढले. आदित्य यांनी बुधवारी रात्री राहुल यांच्याशी, तर गुरूवारी केजरीवाल यांच्याशी हितगुज केले. त्यावेळी संजय राऊत, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरेसेनेचे इतर नेते उपस्थित होते.
विरोधकांकडून निवडणूक प्रक्रियेच्या प्रामाणिकपणाविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. निवडणूक प्रक्रियेत, मतदार याद्यांमध्ये अनियमितता असल्याचा आक्षेप ते घेत आहेत. तो मुद्दा राहुल-आदित्य चर्चेत उपस्थित झाल्याचे समजते. राहुल आणि केजरीवाल यांच्या भेटींनंतर आदित्य यांची दिल्लीत पत्रकार परिषद झाली.
त्यावेळी बोलताना ते म्हणाले, भाजप आणि निवडणूक आयोगात कुठला भेद उरला आहे का? माझे मत कुठे जाते तेही मला ठाऊक नाही. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटविषयी अधिक स्पष्टता येण्याची गरज आहे. मतदारयाद्या, इव्हीएमशी संबंधित अनियमिततांच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी एकवटायला हवे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे आपला दिल्लीची सत्ता गमवावी लागली. तो निकाल ताजा असतानाच आदित्य यांनी केजरीवाल यांची भेट घेतली. मैत्रीची कृती म्हणून ती भेट झाल्याचे आदित्य यांनी नमूद केले. सरकारे येतात आणि जातात. मैत्री कायम राहते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.





