Aditi Tatkare : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शासन सकारात्मक; मंत्री अदिती तटकरेंनी दिली माहिती
Aditi Tatkare : अंगणवाडी बालकांना अधिक गुणवत्तापूर्ण आहार उपलब्ध करून देण्यासाठी आहार दरवाढीबाबत शासन सकारात्मक असून त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू आहे.

Aditi Tatkare : अंगणवाडी बालकांना अधिक गुणवत्तापूर्ण आहार उपलब्ध करून देण्यासाठी आहार दरवाढीबाबत शासन सकारात्मक असून त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू आहे.
तसेच अंगणवाडी मदतनीस पदावरून थेट नियुक्तीने अंगणवाडी सेविका पदावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यासंदर्भातही सकारात्मक पावले उचलली जात आहेत, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री तटकरे बोलत होत्या. बैठकीत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
तटकरे (Aditi Tatkare) म्हणाल्या, अंगणवाडीतील बालकांना अधिक उत्कृष्ट आणि पोषक आहार मिळावा यासाठी आहार दरवाढीचा प्रस्ताव प्रक्रियेत आहे. कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटी संदर्भात शासन सकारात्मक असून विभागामार्फत त्यासंबंधी प्रस्ताव सादर केला आहे.
तसेच प्रोत्साहन भत्ता आणि केंद्र शासनाकडील थकीत मानधन तातडीने अदा करण्याबाबतही कार्यवाही सुरू आहे. महानगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांच्या भाडेवाढीसंदर्भात केंद्र शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.
तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील अडचणी कमी करण्यासाठी केंद्रांमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.






