सर्वसामान्यांपर्यंत गोल्फ पोहोचल्याचा आनंद; पण पदक हुकल्याची निराशाच : आदिती अशोक

टोकियो – मला वाटतं की आता भारताने गोल्फला समजून घेतलं आहे. ऑलिम्पिकमध्ये गोल्फ सुरु असताना लोकांनी खूप प्रेम दिलं. चांगला पाठिंबा दिला. आतापर्यंत सधन लोकांचा खेळ म्हणून गोल्फकडे पाहिलं जाचयं. पण आता सर्वसामान्य लोकांपर्यंत गोल्फ पोहोचलंय, याचा आनंद वाटतोय. तरिही ऑलिम्पिक म्हणजे खेळांचा कुंभमेळा असताना या स्पर्धेत चौथ्या स्थानावर मी खूश कसं राहू? असा भावूक प्रश्न भारतीय महिला गोल्फर आदिती अशोक हिनं विचारला आहे.
टोकियो ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी गोल्फमध्ये आदिती अशोकचं रौप्य पदक थोडक्यात हुकलं. संपूर्ण तीनही फेऱ्यांमध्ये सातत्याने पहिल्या-दुसऱ्या स्थानावर असलेल्या आदितीला पावसाच्या व्यत्ययामुळे चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. जागतिक मानांकनात 200 व्या स्थानावर असलेल्या आदितीने ऑलिंपिकमधील पदार्पणातच चौथे स्थान मिळवल्याबद्दल तिचेही कौतुक पदक विजेत्यांइतकेच होत आहे. ऐतिहासिक कामगिरी नोंदवूनही आदितीली दु:ख आहे, ते पदक हुकल्याचेच.
शुक्रवारी रात्री दुसऱ्या स्थानावर असलेली आदितीची शनिवारी चौथ्या राऊंडमध्ये घसरण झाली. 269 गुणांसह ती चौथ्या स्थानावर राहिली. दुसरी कोणती स्पर्धा असती तर मी खूश राहिली असते पण आता कशी खूश राहू? ऑलिम्पिकमध्ये मी चौथ्या स्थानावर राहिले याचं वाईट वाटतंय, असं ती म्हणते.
मी गोल्फ खेळायला सुरुवात केली होती, त्यावेळी मला कधीच वाटलं नव्हतं, की मी कधी ऑलिम्पिक खेळेन. त्यावेळी गोल्फ ऑलिम्पिकमध्ये खेळलं जात नव्हतं. मेहनत आणि खेळाचा पूर्ण आनंद घेऊन मी इथपर्यंत पोहोचले आहे. आपण या स्पर्धेत पदकाच्या अगदी जवळ जाऊ शकतो, असं मला खेळताना कधीही वाटलं नाही. अन्यथा माझं खेळावरचं एकाग्रचित्त ढळलं असतं.
आदितीची ही केवळ दुसरी ऑलिम्पिक होती. तिने 2016 च्या रिओमध्ये ऑलिम्पिक पदार्पण केले. पदार्पणाच्या ऑलिम्पिकमध्ये ती पदकापासून वंचित राहिली होती. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये तिने तिच्या कामगिरीने बरीच प्रसिद्धी मिळवली पण नंतर ती गती कायम राखू शकली नाही आणि तिने 41 व्या क्रमांकावर रिओमधील आपला प्रवास संपवला. पण टोकियोमध्ये तिने रिओच्या चुकांमधून धडा घेतला आणि चौथ्या क्रमांकावर राहून आपला टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपला ठसा उमटवला आहे.





