Pune | क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या नावे अध्यासन

पुणे, – क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या नावाने अध्यासन स्थापन करण्याच्या प्रस्तावाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे यांनी विद्यापीठात याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी. बी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने दिलेल्या अहवालानुसार व्यवस्थापन परिषद सदस्यांनी एकमताने अध्यासन स्थापनेस मान्यता दिली.
आदिवासी समाजाचे प्रश्न गंभीर असून अलीकडे सांस्कृतिक आणि राजकीय वर्चस्ववादामुळे हे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झारखंड येथील बिरसा मुंडा या आदिवासी युवकाने आदिवासींच्या प्रश्नाकडे देशाचे आणि जगाचे लक्ष वेधले.
दारिद्र्य आणि अज्ञानात कितपत पडणाऱ्या या समाजाच्या प्रश्नांची कोंडी फोडण्याचा प्रयत्न बिरसा मुंडा यांनी केला. स्वतंत्र भारतात राष्ट्रपतींनी बिरसा मुंडा यांना राष्ट्रीय नेता युगपुरुष म्हणून घोषित केले. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बिरसा मुंडा यांच्या नावाने अध्यासन सुरू करावे, या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे.




