पुणे जिल्हा | मुगावर पिवळा मोझॅकचा घाला

शिरूर, (वार्ताहर) – खरीप हंगामातील मूग पिकावर अल्प प्रमाणात पिवळा मोझॅक दिसुन येत आहे. शेतकर्यांनी दुर्लक्ष न करता तात्काळ उपाययोजना कराव्यात, असे आवाहन शिरूर मंडळ कृषी अधिकारी कांतीलाल वीर यांनी केले आहे.
निर्वी (ता. शिरूर) येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत मूग पिकाचे उत्पादन वाढीसाठी मूग प्रकल्प अंतर्गत पिक प्रात्यक्षिक घेण्यात आले. मूग पीक प्रात्यक्षिकामध्ये बीबीएफ म्हणजेच रूंद सरी वरंबा पद्धतीनेच पेरणी केली आहे.
बीज प्रक्रिया रायझोबियम व ट्रायकोडर्मा तसेच पीएसबीची करण्यात आल्याने पिकाची उगवण व वाढ अतिशय चांगली दिसून आली आहे. शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले असून कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, मंडळ कृषी अधिकारी कांतीलाल वीर, कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे व कृषी सहायक जयवंत भगत, सुनील नाइक यांनी वेळोवेळी प्रक्षेत्रास भेटी देऊन मार्गदर्शन करीत आहेत.
निर्वी येथील रमेश पवार यांच्या प्रक्षेत्रास अधिका-यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता पिवळा मोझॅकची दोन तीन झाडे दिसून आली आहे. शेतकर्यांनी मुगाचे उत्पादन पिवळा मोझॅक मुळे घटु नये म्हणुन तात्काळ उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
या उपाययोजना करा
पिवळा मोझॅक यावर कसलाही उपाय नाही. त्याचा प्रसार होऊन नये म्हणून पिवळी झाडे उपटून टाकणे तसेच रस शोषण करणार्या किडी या पिवळा मोझॅकचा प्रसार करीत असल्याने त्यांच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 10 लिटर 20 मिली किंवा असिटामाप्रीड 10 लिटर 4 ग्रॅम किंवा थायोमेथोक्साम 10 लिटर 4 ग्रॅम किंवा डायफेंथियुरॉन 50 टक्के डब्ल्यूपी 10 लिटर 8 ते 10 ग्रॅम या प्रमाणात किटकनाशकाची फवारणी घ्यावी.
तसेच पिवळे चिकट सापळे लावावेत, अशा स्वरूपाच्या उपाययोजना केल्या तर हा विषाणू वाढणार नाही व उत्पादनात घट होणार नसल्याचे कृषी सहायक जयवंत भगत यांनी सांगितले.





