त्या शेतकऱ्याची झोळी रिकामीच ! आडत्याने हात झटकले; पुणे बाजार समितीच्या भूमिकेकडे लक्ष

पुणे, दि. 11 -परदेशी भाजीपाल्याचा पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याचे मार्केट यार्डातील डमी आडत्याकडे पाच लाख रुपये अडकल्याचे उघड झाले होते. याची दखल घेऊन बाजार समितीने ज्या गाळ्यावर डमी काम करत होता, त्या आडत्याला नोटीस बजावून पैसे भरण्यास सांगितले होते. मात्र, त्या आडत्याने हात वर केले आहेत. डमी 1 जून 2022 पासून माझ्याकडे काम करत होता. थकलेली रक्कम त्यापूर्वीची असल्याचे त्याने म्हटले आहे. त्यामुळे थकलेली रक्कम पुरवठादार शेतकऱ्याला परत मिळणार का, बाजार समिती यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फळ, भाजीपाला विभागात डमी आडत्यांचा सुळसुळाट झाला आहे. डमींकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे उघड झाले होते. शेतकरी आणि पुरवठादार शेतकरी असलेल्या दोघांनी याबाबत बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली होती. बाजार समिती प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली. डमी देत नसतील, तर पैसे देण्याची जबाबदारी ते काम करत असलेल्या आडत्यांची आहे, अशी भूमिका घेत संबंधित आडत्यांना नोटीस बजावली. त्यापैकी एका शेतकऱ्याने हिशेबपट्टी न देता 32 हजार थकविल्याची तक्रार दिली होती. त्या शेतकऱ्याला बाजार समितीच्या नोटीसीनंतर संबंधित रक्कम मिळाली. मात्र, पुरवठादार शेतकऱ्याने पाच लाख रुपये थकविल्याची तक्रार केली होती. ते डमी काम करत असलेल्या आडत्याने नोटीशीला उत्तर दिले आहे. 1 जून ते 18 सप्टेंबर 2022 या कालावधीत तो गाळ्यावर काम करत होता. थकीत रक्कम यापूर्वीची आहे. गाळ्यावर काम करत असलेल्या कालावधीतील थकीत असल्यास द्यायला तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पूर्वीच्या रकमेचे काय होणार, पुरवठादार शेतकऱ्यांना पैसे मिळणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन वर्षांपासून त्या डमी आडत्याने पैसे थकविल्याचे पुरवठादार शेतकऱ्याने म्हटले आहे. रक्कम मिळण्यास आधीच विलंब झाला आहे. आता वसुलीच्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे. तो काम करत असलेल्या गाळ्यांच्या आडत्यांची चौकशी करून रक्कम वसूल करण्यास किती वेळ लागणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
पुरवठादार शेतकऱ्याची रक्कम वसूल करून देण्याची जबाबदारी बाजार समिती प्रशासनाची आहे. ती रक्कम वसूल करून दिली जाईल. नोटीशीला उत्तर देणारा आडतदार आणि त्यापूर्वी कोणत्या आडतदाराकडे तो काम करत होता, याची माहिती घेतली जाईल. ज्या गाळ्यावर काम करताना रक्कम थकली आहे. त्या आडतदाराकडून वसूल केली जाईल. -मधुकांत गरड, प्रशासक, बाजार समिती, पुणे




