अदानी पॉवरकडून बांगलादेशच्या वीज पुरवठ्यात कपात

नवी दिल्ली – अनेक वेळा सूचना देऊनही बांगला देशाने वीजपुरवठ्याचे बिल न दिल्यामुळे अदानी पॉवर कंपनीने बांगला देशाच्या वीज पुरवठ्यात 60 टक्के इतकी कपात केली. त्यामुळे बांगलादेशात वीज पुरवठ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
अदानी पॉवर कंपनीने वीज पुरवठ्यात कपात केल्यानंतर बांगलादेशाच्या वीज मंडळाने अदानी समूहाला 173 दशलक्ष डॉलर म्हणजे 1,450 कोटी रुपये तडकाफडकी देऊ केले आहेत. बांगला देशाची विजेपोटीे 843 दशलक्ष डॉलरची थकबाकी आहे. ती कमी करण्याची सूचना गेल्या महिन्यात अदानी पावर कंपन्याने वेळोवेळी केली होती.
मात्र बांगला देशाला या रकमेची जमवाजमव करता आली नाही. आता काही प्रमाणात बांगलादेशाने रक्कम देऊ केली आहे. जर या आठवड्यात बांगलादेशाने विजेचे बिल दिले नाही तर पूर्ण वीज पुरवठा खंडित करण्याची नोटीस अदानी पॉवरने बांगलादेशाच्या वीज मंडळाला दिली आहे.
अदानी पॉवर बांगला देशाला झारखंड मधील दोन प्रकल्पातून 1,600 मेगावॅट वीज पुरवठा करीत आहे. आता 800 मेगावॅटचा एक प्रकल्प बंद करण्यात आला आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी बांगला देशाने अतिरिक्त 20 दशलक्ष डॉलर द्यावे अशी मागणी अदानी पॉवर कंपनीने केली आहे.





