Adani Group: अदानींवर अमेरिकेतील न्याय विभागाचे भ्रष्टाचाराचे आरोप

नवी दिल्ली – अदानी समूहातील ग्रीन एनर्जी कंपनीने भारतातील दक्षिण भागातील राज्यांना सौरऊर्जा पुरवठ्यासाठी कंत्राट मिळविण्याकरता 250 दशलक्ष डॉलर म्हणजे 2,100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप अमेरिकेतील न्याय विभागाने व शेअर बाजार नियंत्रकांनी केला आहे. यामध्ये अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी, त्यांचे नातेवाईक सागर अदानी आणि इतर संचालकांचा समावेश आहे.
मात्र हे केवळ आरोप आहेत. आम्ही आमची बाजू अमेरिकन न्यायालयात मांडणार आहोत आणि स्वतःला निष्पाप सिद्ध करणार आहोत, आमच्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत असे अदानी ग्रीन एनर्जीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. या घडामोडीनंतर अदानी समूहाने 600 दशलक्ष डॉलरच्या बॉण्डची विक्री आणि त्यानंतरची पुढील प्रक्रिया थांबविली आहे.
या घडामोडीनंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरचे भाव 22 टक्क्यापर्यंत कोसळल्यामुळे या समूहाचे एकाच दिवसात 2.19 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या समूहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्या किरकोळ गुंतवणूकदाराबरोबरच एलआयसीसारख्या संस्थागत गुंतवणूकदारांवरही परिणाम झाला आहे.
या अगोदर अमेरिकेतील हिंडेनबर्ग समूहाने अदानी समूहावर गैरप्रकाराचे आरोप केल्यानंतर या समूहावर जेवढा परिणाम झाला होता त्यापेक्षा दुप्पट परिणाम आज झालेल्या आरोपामुळे झाला आहे. या आरोपानंतर भारतातील विरोधी पक्षांनी केंद्र सरकार व अदानी समूहावर जोरदार टीका केली आहे.




