अदानी समूहाने सहा विमानतळांसाठी भरले 2240 कोटी रुपये

नवी दिल्ली – देशातील सहा विमानतळ चालवण्यासंदर्भातील अदानी समूहाची निविदा मंजूर झाल्याने या समूहाने त्यासाठी एकरकमी 2440 कोटी रुपये भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे (एएआय) भरले आहेत. सरकारच्या मालकीचे असणारे सहा विमानतळ चालवण्यासाठी गुजरातमधील अहमदाबाद येथील अदानी समूहाला देण्यात आले असून या विमानतळांवर चालू असणारी कामे आणि संपत्ती नियमनासाठीच्या गुंतवणुकीसाठी ही रक्कम देण्यात आलेली आहे.
या रकमेतून प्राधिकरणाने दैनंदिन खर्चासाठी घेतलेल्या भांडवली कर्जाची काही प्रमाणात परतफेड करण्यात आली असून हे कर्ज गेल्यावर्षी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची गरज भागवण्यासाठी घेण्यात आले आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात दैनंदिन भांडवली गरजा भागवण्यासाठी प्राधिकरणाने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून टप्प्याटप्याने सुमारे 1,500 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. करोना आणि लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हे कर्ज घ्यावे लागल्याचे प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीवकुमार यांनी सांगितल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. 2020-21 या वर्षात प्राधिकरणाला तब्बल 1962 कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे. प्राधिकरणाने याआधीच भांडवली कर्जापैकी 600 कोटी रुपयांचे कर्ज फेडलेले आहे.
स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेतून अदानी समूहाने अहमदाबाद, लखनौ, मंगळूर, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुंअनंतपुरम येथील विमानतळ चालवण्यास घेतले आहेत. अदानी एअरपोर्टस् होल्डिंग्जद्वारे हे विमानतळ तसेच मुंबईतील विमानतळ चालवण्यात येणार आहे. मुंबईतील विमानतळ चालवण्याचे हक्क अदानी समूहाने जीव्हीके समूहाकडून विकत घेतले आहेत. विमानांची ये-जा याखेरीज याठिकाणी असणाऱ्या संपत्तीच्या योग्य व्यवस्थापनातून व्यवसाय निर्मिती करण्यावर अदानी समूहाचा भर असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.





