Narsayya Adam Mastar : आडम मास्तरांची राजकारणातून निवृत्ती

सोलापूर : जिल्ह्यातील माजी आमदार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) नेते नरसय्या आडम (मास्तर) यांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचा सलग चौथ्यांदा पराभव झाला आहे. त्यानंतर आडम मास्तरांनी हा निर्णय घेतला आहे. आयुष्यभर सामाजिक चळवळीत काम करणारे नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. यापुढे केवळ पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निवडणुकीमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आडम मास्तर यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव स्वीकारावा लागला. हा त्यांचा सलग चौथा पराभव आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघातून यावेळी महाविकास आघाडी आडम मास्तरांना संधी देईल, अशी त्यांना अपेक्षा होती.
मात्र काँग्रेसने येथून चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आडम यांनी काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र कोठे हे विजयी झाले आहेत. त्यामुळे आता आडम मास्तरांनी संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे आणि माकपचे नेते नरसय्या आडम हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जात होते.
मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आडम मास्तरांनी प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला होता. त्याचा फायदा देखील शिंदे यांना झाला. प्रणिती शिंदे लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांच्या रिक्त असलेल्या विधानसभेच्या जागेवर आडम मास्तरांनी पुन्हा एका तयारी सुरू केली होती. तसेच त्यासाठी माकपकडून ‘नोट भी दो, वोट भी दो’ अभियान राबवण्यात आले. मात्र, महाविकास आघाडीने नरसय्या आडम यांच्यासाठी ही जागा सोडली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा या मतमदारसंघातून निवडणूक लढवली. यात त्यांचा पराभव झाला.





