अभिनेत्री तेजश्री प्रधानचे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक; मालिकेचा प्रोमो आऊट

मुंबई – अभिनेत्री तेजश्री प्रधान ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून घराघरात पोहचली. या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. या मालिकेनंतर तेजश्री ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेतही शुभ्रा नावाच्या भूमिकेत झळकली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तेजश्री नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ असे या मालिकेचे नाव असून येत्या 4 सप्टेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
स्टार प्रवाहवर सुरू होणाऱ्या या मालिकेचा तेजश्रीने इंस्टाग्रामवर प्रोमो शेअर केला आहे. ज्यात तेजश्रीने मुक्ताची भूमिका साकारली आहे. तर शुभांगी गोखले यांनी तिच्या आईची भूमिका साकारली आहे. याशिवाय सागरच्या भूमिकेत राज हंचनाळे दिसणार आहे. तेजश्री आणि राज पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या प्रोमोमध्ये मुक्तासाठी आई स्थळ शोधत असते. तर दुसरीकडे सागर ज्याची पत्नी नाही आणि त्याला एक मुलगी आहे. त्याची आईदेखील त्याच्यासाठी दुसरी पत्नी शोधत आहे. मात्र त्यालाही लग्न करण्याची इच्छा नसल्याचे दिसते.
View this post on Instagram
मात्र यात सागरची लेक आणि मुक्तामध्ये छान बॉण्डिंग असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे सागर आणि मुक्ताचे प्रेम बहरणार का? हे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. तेजश्री प्रधान, शुभांगी गोखले, राज हंचनाळे, संजीवनी जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ‘प्रेमाची गोष्ट’ ही नवी मालिका सोमवार 4 सप्टेंबरपासून रात्री 8 वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘लेक लाडकी या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’ अशा या मालिकांनंतर तेजश्रीची ही मालिका देखील प्रेक्षकांचे मन जिंकणार का? हे पाहावे लागणार आहे.





