अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी लाखोंची चोरी ! मुंबई पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी चित्रपटांपासून दूर असली तरी ती आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते. वयाची पंचेचाळीशी पार केल्यानंतर देखील शिल्पाचा फिटनेस आजच्या घडीला भल्या भल्या नवख्या अभिनेत्रींना लाजवेल असाच आहे.शिल्पा अनेकदा केवळ आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. शिल्पाच्या घरी चक्क चोरी झाल्याचे समोर आले.
अभिनेत्री शिल्पाच्या घरात चोरीची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. जुहू येथील घरात ही चोरी झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या आठवड्यात अभिनेत्रीच्या जुहू येथील निवासस्थानातून काही मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे अधिकाऱ्याने सांगितले ज्यांची किंमत लाखोंच्या घरात होती.
तक्रारीच्या आधारे जुहू पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी तपास पथकाने दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे समजते. यावेळी चोरट्यांनी पंचवीस फूट इमारत ओलांडून घरात प्रवेश केला आणि त्यानंतर ते खिडकीतून आत शिरले. तोंडाला गमछा बांधून घरातील प्रत्येक खोलीत जात भामट्यांनी चोरी केल्याचे समोर आले आहे.
आपल्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी शिल्पा शेट्टीने एक दिवसापूर्वीच तिच्या चाहत्यांना एका पोस्टद्वारे सांगितले होते की ती इटलीमध्ये सुट्टी साजरी करत आहे. तिने स्विमसूट घातलेला एक फोटो देखील शेअर केला होता. शिल्पाचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला होता.





