सायली संजीव करणार छोट्या पडद्यावर कमबॅक, ‘या’ लोकप्रिय अभिनेत्यासोबत झळकणार

Actress Sayali Sanjeev |अभिनेत्री सायली संजीव मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची ‘काहे दिया परदेस’ ही मालिका विशेष गाजली. या मालिकेच्या माध्यमातून सायली घराघरात पोहोचली. या मालिकेने निरोप घेतल्यानंतर सायलीने अनेक चित्रपटांमध्येही काम केले. मात्र, मराठी मालिकेत तिने काम केले नव्हते. परंतु, आता तिच्या चाहत्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. सायली लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करण्याची शक्यता आहे.
सायली लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या वाहिनीवर ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान अनेक कलाकार परफॉर्म्स सादर करतात. या सोहळ्याचा एक व्हीडिओ समोर आला असून, यामध्ये सायली देखील दिसत आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीकडून नवीन मालिका सुरू करण्यापूर्वी नवीन कलाकारांची प्रेक्षकांना ओळख करून दिली जाते. विविध माध्यमातून त्यांना प्रेक्षकांसमोर आणले जाते. आता ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळ्याच्या माध्यमातून सायली संजीवच्या नवीन मालिकेची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. याआधीही एका मुलाखतीमध्ये बोलताना तिने लवकरच मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले होते.
View this post on Instagram
या सोहळ्याच्या प्रोमोमध्ये सायलीसोबत ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेला अभिनेता चेतन वडनेरे डान्स करताना दिसत आहे. त्यामुळे नवीन मालिकेमध्ये हे दोघे एकत्र काम करताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या मालिकेचे नाव काय असेल व ही नवी मालिका कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याचा खुलासा 16 मार्चला ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळ्यादरम्यान होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचे तर ती ‘काहे दिया परदेस’ नंतर ‘परफेक्ट पती’ या हिंदी मालिकेतही झळकली होती. याशिवाय, तिने ‘मन फकिरा’, ‘झिम्मा’, ‘हर हर महादेव’, ‘सातारचा सलमान’, ‘फुलराणी’, ‘झिम्मा २’, ‘ओले आले’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.





