अभिनेत्री रवीना टंडनच्या वाट्याला आव्हानात्मक भूमिका! ‘माँ वंदे’ चित्रपटात दिसणार; कथा ऐकून झाली भावनिक

Raveena Tandon : प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने नेहमीच वेगळ्या धाटणीच्या भूमिका केलेल्या आहेत. ९० दशकात रवीनाने बॅालिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केल्यानंतर अनेक सिनेमात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली. तिने अनेक अभिनेत्रीच्या स्पर्धेत स्वतःला टिकून ठेवले. आजही रवीना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारताना दिसते. आता तिच्या आगामी चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली असून, एका आव्हानात्मक भूमिकेत रवीना टंडन दिसणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनपटावर आधरित चित्रपटात रवीना महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेनची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात मोदी आणि त्यांच्या आई हिराबेन यांच्या नाते चित्ररुपाने दाखविण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींची भूमिका दक्षिण भारतीय अभिनेता साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव माँ वंदे असणार आहे.
वृत्तानुसार, रवीना टंडन ही भूमिका साकारताना भावनिक झाली आहे आणि चित्रपटाची कथा ऐकून ती भावूकही झाली होती. चित्रपटाची खोली, ताकद आणि गुंतागुंत पाहता, ती पंतप्रधान मोदींच्या आईची भूमिका साकारण्यास खूप उत्सुक आहे. या चित्रपटात पंतप्रधान मोदींच्या आईने आपल्या मुलाचे जीवन सुधारण्यासाठी घेतलेल्या त्याग आणि संघर्षांचे चित्रण दाखविण्यात येणार आहे. रवीनाच्या कामाची दखल घेत २०२३ मध्ये तिला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
मार्को चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा मल्याळम अभिनेता उन्नी मुकुंदन या चित्रपटात पंतप्रधान मोदींची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. गेल्या काही वर्षांत त्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांची मने आणि निर्मात्यांचा विश्वास जिंकला आहे. आता तो एक मोठी जबाबदारी घेत आहे. अहवालांनुसार, हा चित्रपट व्हीएफएक्स आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बनवला जाईल आणि तो मोठ्या कॅनव्हासवर चित्रित केला जाणार आहे. या चित्रपटात पंतप्रधान मोदींशी संबंधित वास्तविक जीवनातील घटनांचा समावेश असणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.





