अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या भावाला ड्रग्ज प्रकरणात अटक

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा भाऊ अमन प्रताप सिंह याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हैदराबाद पोलिसांनी अमनसह चार जणांवर कारवाई केली आहे. तेलंगणा ॲन्टी नारकोटिक्स विभागाने त्यांच्याकडून जवळपास 2.6 किलो ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. हे कोकेन विक्रीसाठी हैदराबादमध्ये आणण्यात आले होते, अशी माहिती आहे.
ही कारवाई तेलंगणा अँटी नारकोटिक्स ब्युरो, डेप्युटी पोलीस आयुक्त, सायबराबाद पोलिसांनी यांनी संयुक्तपणे केली. त्यांनी हैदराबादमध्ये पाच ड्रग्ज डिलर्सना अटक केली आहे. ड्रग्ज डिलिंगमधील मुख्य आरोपी नायजेरिचा आहे. ओनुओहा ब्लेसिंग असे त्याचे नाव आहे. हा बंगळुरुमधील हेअर स्टायलिस्ट आहे. त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी अमन प्रीत सिंहसह 13 ड्रग्ज डिलर्सची नावे सांगितली आहेत. त्यापैकी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ईडीने गेल्या वर्षी रकुलला चौकशीसाठी बोलावले होते. अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात तिची चौकशी करण्यात आली होती. तपास यंत्रणांनी 2022 आणि 2021 मध्येही रकुलची जबानी नोंदवली होती.





