Nyra Banerjee : सलमानला समोर पाहताच उडाली घाबरगुंडी; अभिनेत्री नायरा बॅनर्जीने सांगितला जुना किस्सा, नेमकं काय घडलं?
Nyra Banerjee : सलमान खान तिथे असल्याचे समजल्यानंतर नायराला त्याची भेट घ्यायची इच्छा झाली. तिने याबाबत प्रियदर्शन यांच्याकडे विनंती केली.

Nyra Banerjee : ‘बिग बॉस १८’ या रिअॅलिटी शोमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री नायरा बॅनर्जी सध्या एका जुन्या किस्स्यामुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याला भेटण्याची संधी मिळाल्यानंतर नायराची काय अवस्था झाली होती, याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला आहे. सलमान खानला समोरून येताना पाहून ती इतकी घाबरली की, चक्क थरथर कापू लागली आणि मागे फिरली होती.
प्रियदर्शन यांच्या मदतीने मिळाली सलमानला भेटण्याची संधी
नायरा बॅनर्जी एका मुलाखतीत बोलताना म्हणाली की, ती दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या चित्रपटाचे शूटिंग करत होती. त्याचवेळी जवळच सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. सलमान खान तिथे असल्याचे समजल्यानंतर नायराला त्याची भेट घ्यायची इच्छा झाली. तिने याबाबत प्रियदर्शन यांच्याकडे विनंती केली.
प्रियदर्शन यांनी नायराची इच्छा लक्षात घेऊन सलमान खानला सेटवर बोलावले. विशेष म्हणजे, सलमान कोणत्याही सुरक्षा रक्षकांशिवाय थेट तिच्या सेटवर आला. त्याला भेटण्यासाठी नायराही पुढे गेली होती. मात्र, सलमान खान जवळ येत असल्याचे पाहून तिची भीतीने घाबरगुंडी उडाली.
सलमानला पाहताच थरथर कापू लागली अभिनेत्री
या प्रसंगाची आठवण सांगताना नायरा म्हणाली की, “सलमान खान माझ्या दिशेने येत होते. त्यांना समोरून येताना पाहून माझे हातपाय थरथरू लागले. त्यानंतर मी उलट्या दिशेने चालू लागली.”
नायराच्या टीमने तिला थांबवले आणि सलमान खान यांच्याशी बोलण्यासाठी प्रोत्साहित केले. ‘प्लीज, जा आणि सलमान खान यांच्याशी बोल,’ असे तिच्या टीमने तिला सांगितले. या अनपेक्षित प्रसंगामुळे सलमान खानला भेटण्याचा अनुभव तिच्यासाठी कायम लक्षात राहणारा ठरला.
नायरा बॅनर्जीने अनेक मालिकांमध्ये केले आहे काम
‘दिव्य दृष्टि’, ‘पिशाचिनी’ यांसारख्या मालिकांमधून नायराने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय ती ‘खतरों के खिलाडी १३’ आणि ‘बिग बॉस १८’ या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, नायराने ‘कमाल धमाल मालामाल’ आणि ‘वन नाइट स्टँड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.





