बंगळुरू : दुबईहून मायदेशी सोने तस्करी केल्याचे उघडकीस आल्यानंतर दाक्षिणात्य अभिनेत्रीचे वडिलही आता अडचणीत सापडले आहेत. आर्थिक गुन्हे न्यायालयाने 12.56 कोटी रुपयांच्या सोन्याच्यातस्करी प्रकरणात कन्नड अभिनेत्री रान्या रावचा जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळला आहे. आता याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईला वेग आला असून कर्नाटक सरकारही ॲक्शन मोडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. कर्नाटक सरकारने सोने तस्करी प्रकरणी अभिनेत्रीचे वडिल डीजीपी रामचंद्र राव सक्तीच्या सुट्टीवर पाठवले आहे. रान्या राव सोने तस्करी प्रकरणी न्यायालयीन सुनावणीत महसूल गुप्तचर संचालनालयाने रान्या रावच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. रान्या राव सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या नेटवर्कचा भाग आहे. त्यामुळे तिला जामीन दिल्याने तपासात अडथळे येऊ शकतात. ती पुराव्यांशी छेडछाड करू शकते किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकते असा युक्तिवाद डीआरआयने केला होता. त्याच आधारे कोर्टाने रान्या रावचा जामीन फेटाळला आहे. रान्या राव ही कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे महासंचालक आयपीएस रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. 3 मार्च रोजी तिला अटक करण्यात आल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणी रामचंद्र राव यांची काही भूमिका आहे का याचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता यांना तपासाचे अधिकार दिले आहेत. आता, रामचंद्र राव यांना तत्काळ सुट्टीवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे, याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत आहे.