कोलकाता – राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलेल्या प. बंगालमधील दोन सदस्यांची मुदत समाप्त झाली आहे. स्वप्न दास गुप्ता आणि अभिनेत्री रूपाली गांगुली ही या दोन सदस्यांची नावे आहेत. त्यामुळे लवकरच अन्य दोन सदस्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता असून नवे चेहरेही बंगालमधीलच असतील असे सांगितले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प. बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा प्रचार करणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. रूपा गांगुली यांच्या जागेवर त्यांना पाठवले जाणार आहे. मिथुन यांनी गेल्याच आठवड्यात कोलकाता येथील भाजप मुख्यालयाला भेट दिली होती.
यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. मिथुन चक्रवर्ती अगोदरही तृणमूल कॉंग्रेसतर्फे राज्यसभेवर गेले आहेत. मात्र, चिट फंड घोटाळ्यात नाव आल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर तब्बल एक वर्ष ते राजकारणापासून दूरच होते.
आता त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करून लोकसभा निवडणुकीपर्यंत बंगालच्या जनतेपर्यंत योग्य संदेश पोहोचवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे मानले जाते आहे.
दरम्यान, दुसऱ्या नावासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या पत्नी नृत्यांगना डोना गांगुली यांची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळीच गांगुली यांना भाजपचा चेहरा करून रिंगणात उतरवण्याची भाजपची इच्छा होती. मात्र, ते होऊ शकले नाही. आता त्यांच्या पत्नीला राज्यसभेवर पाठवून भाजप वेगळी खेळी खेळण्याच्या प्रयत्नात आहे. ही दोन नावे जरी पुढे आली असली तरी भाजपच्या गोटातून त्याला अद्याप दुजोरा दिला गेलेला नाही.