Actor Dharmendra : अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण जाहीर; चित्रपटसृष्टीतील योगदानाची सर्वोच्च दखल
Actor Dharmendra: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना त्यांच्या दीर्घकालीन आणि बहुआयामी योगदानाबद्दल पद्म विभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

Actor Dharmendra: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना त्यांच्या दीर्घकालीन आणि बहुआयामी योगदानाबद्दल पद्म विभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना मरणोत्तर स्वरूपात देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कार यादीत धर्मेंद्र (Dharmendra)यांच्यासह झारखंडचे ज्येष्ठ नेते शिबू सोरेन यांनाही राजकीय क्षेत्रातील योगदानासाठी मरणोत्तर पद्म विभूषण जाहीर करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जाहिरात क्षेत्रातील दिग्गज पियुष पांडे यांनाही मरणोत्तर पद्म भूषण जाहीर झाला आहे.

Dharmendra
देशी मातीतला हिरो
१९६० च्या दशकात चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या धर्मेंद्र यांनी रोमँटिक हिरो, अॅक्शन स्टार, गंभीर अभिनेता आणि विनोदी भूमिकांपर्यंत प्रत्येक छटा समर्थपणे साकारली.
‘दिल भी तेरा हम भी तेरे’, ‘अनपढ’, ‘बंदिनी’, ‘फूल और पत्थर’, ‘आयी मिलन की बेला’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘आये दिन बहार के’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी अभिनयाची छाप उमटवली.
‘यादों की बारात’मधील शंकर, ‘सीता और गीता’, ‘ड्रीम गर्ल’ आणि विशेषतः ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘चुपके चुपके’मधील प्यारे मोहन ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. गंभीर अभिनयाइतकाच विनोदातही ते तितकेच सहज होते, हे त्यांनी ठसवून दाखवलं.
Padma Awards | Late Dharmendra Singh Deol (Posthumous) to be conferred with Padma Vibhushan in the field of Art. pic.twitter.com/2IoKvJ8NBH
— ANI (@ANI) January 25, 2026
पुरस्कारांची दखल उशिरा का होईना
दीर्घ आणि यशस्वी कारकिर्द असूनही धर्मेंद्र (Dharmendra )यांना वैयक्तिक अभिनय पुरस्कार तुलनेने कमी मिळाले. १९९७ मध्ये त्यांना लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर २०१२ मध्ये भारत सरकारने त्यांच्या सिनेसृष्टीतील योगदानाची दखल घेत पद्म भूषण देऊन गौरव केला होता.
आता, त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आणि भारतीय चित्रपटसृष्टीवरच्या प्रभावाचा गौरव म्हणून पद्म विभूषण जाहीर करण्यात आलं आहे. देशी मातीतला हा हिरो भारतीय सिनेमाच्या इतिहासात कायमस्वरूपी कोरला गेला आहे.





