Nagar | आ. गडाख गटाला मोठा धक्का , 150 कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

नेवासा, (प्रतिनिधी) – नेवासा विधानसभा मतदार संघातील शिवसेना (ठाकरे) गटाचे आमदार शंकरराव गडाख यांना मानणाऱ्या जवळपास १५० कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नेतृत्व मान्य करत भाजप पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे आ.गडाख गटाला मोठा धक्का बसला आहे.
स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात आमदार गडाख व माजी आमदार मुरकुटे यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश करण्यात आला.
यामध्ये प्रामुख्याने जेऊर हैबती येथील प्रशांत गडाख यांचे कट्टर समर्थक तथा माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे निकटवर्तीय शरदराव शिंदे पाटील, भेंडा येथील शिवसेनेचे माजी तालुका उपाध्यक्ष संजय मिसाळ,पाचेगावचे ज्ञानेश्वर शेळके,
कुकाणा मच्छिंद्र कचरे तसेच प्रवरासंगम येथील शंकरराव गडाख यांचे कट्टर समर्थक दीपक आवाळे यांच्यासह तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. आमदार शंकरराव गडाख गटाला विधानसभेच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात असल्याची प्रतिक्रिया जेऊर हैबती येथील शरदराव शिंदे यांनी दिली आहे.
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की, पालकमंत्री या नात्याने राधाकृष विखे पाटील यांनी नेवासा तालुका दत्तक घेऊन, यापुढे आम्हाला राजकीय ताकत देण्यासाठी खंबीरपणे उभे रहावे, अशी विनंती केली.





